तेल्हारा (विलास बेलाडकर)- तालुका कृषी अधिकारी तेल्हारा आणि पंचायत समिती तेल्हारा यांच्या संयुक्त विद्यमाने राजपूत धर्मशाळा तेल्हारा येथे,”फवारणी करताना घ्यावयाची दक्षता” या विषयावर एक दिवशीय कार्यशाळा दिनांक 29 ऑगस्ट 2019 रोजी पार पडली.
कार्यशाळेला प्रमुख वक्ते म्हणून डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कीटकशास्त्रज्ञ डॉ. गजानन लांडे यांनी मार्गदर्शन केले. प्रमुख उपस्थितांमध्ये कृषी अधिकारी तथा गट विकास अधिकारी श्री. भरत चव्हाण, मंडळ कृषी अधिकारी श्री. उमेश कदम, श्री. विजय डकरे हे होते.
डॉ. लांडे यांनी शेतकऱ्यांनी फवारणी करतेवेळी सुरक्षा किट वापराचे महत्त्व विषद केले. अफ्रॉन, हातमोजे, गॉगल, गमबूट आणि डोक्यावर टोपी घालूनच फवारणी करण्याचे आवाहन केले.दुर्दैवाने एखाद्याला विषबाधा झाल्यास प्रथम उपचार जसे की बाधित व्यक्तीला मोकळ्या हवेत ठेवणे,ओल्या कपड्याने अंग पुसून घेणे, भरपूर पाणी प्यायला देणे जेणेकरून औषध डायलूट होण्यास मदत होते,डोळ्याला बाधा झाल्यास स्वच्छ पाण्याखाली डोळा व्यवस्थित स्वच्छ करावा,बाधित व्यक्तीची शुद्ध हरपून न देणे इत्यादी उपाययोजना दवाखान्यात नेण्यापूर्वी करण्यास सांगितले. डॉक्टर कडे जातेवेळी त्याने फवारलेले औषध व त्याबरोबरचे माहितीपत्रक बरोबर घेऊन जावे जेणेकरून त्या औषधाचा ऑंटीडोट बाधित व्यक्तीला देण्यास डॉक्टरांना मदत व्हावी.
यानंतर कृषी अधिकारी तथा गट विकास अधिकारी श्री चव्हाण यांनी निविष्ठा विक्रेत्यांना मार्गदर्शन केले.कीटकनाशक विक्री करताना किडीवरील कीटकनाशक योग्य प्रमाणात फवारण्याचा सल्ला व मार्गदर्शन निविष्ठा विक्रेत्यांनी शेतकऱ्यांना करावे अशी सूचना त्यांनी केली. फवारणी करणाऱ्या मजुरांना मोफत सुरक्षा किट विक्रेत्यांनी उपलब्ध करून द्यावे असे आवाहन त्यांनी केले.
मंडळ कृषी अधिकारी श्री. उमेश कदम यांनी आपले मनोगत व्यक्त करताना शेतकऱ्यांच्या सुरक्षित भविष्यासाठी स्वतः शेतकऱ्यांनी, निविष्ठा विक्रेत्यांनी आणि कृषी विभागाने एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन केले.त्याच वेळी सुरक्षा किट वापराचे प्रात्यक्षिक दिले.
कार्यशाळेमध्ये काही शेतमजुरांना सुरक्षा किट मोफत वाटण्यात आले आणि माहिती पत्रके देण्यात आली. प्रस्तावना व सूत्रसंचालन श्री. निलेश नेमाडे यांनी केले. तर आभार प्रदर्शन कृषी सहाय्यक श्री. मनोजकुमार सारबुकन यांनी केले.
कार्यशाळेस तेल्हारा तालुक्यातील शेतकरी तसेच कृषी निविष्ठा विक्रेत्यांची उपस्थिती लक्षणीय होती. मंडळ कृषी अधिकारी श्री. विजय डकरे,कृषी पर्यवेक्षक श्री. मेश्राम, श्री. नागे आणि कृषी विभागातील कृषी सहाय्यक उपस्थित होते.