अकोला : दिल्ली- राजस्थानातील कोटाचे खासदार ओम बिर्ला यांची लोकसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक खासदारांनी त्यांचं अभिनंदन केलं. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही आपल्या खुमासदार शैलीत ‘परफेक्ट मॅन’ म्हणत बिर्ला यांचं अभिनंदन केलं आणि सभागृहात एकच हशा पिकला.
इतर मंत्र्यांनी, खासदारांनी बिर्ला यांचे अभिनंदन केल्यानंतर लोकसभेत आठवले उभे राहिले आणि त्यांनी अभिनंदनाच्या कवितेचे सादरीकरण सुरू केलं. ‘एका देशाचं नाव आहे रोम ,लोकसभेचे अध्यक्ष झाले बिर्ला ओम’ कवितेची ही पहिली ओळ उच्चारताच उपस्थितांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य झळकले. यावेळी आठवलेंनी बिर्ला यांना एक छोटासा सल्लाही दिला. ‘लोकसभेचं कामकाज तुम्हाला चालवायचं आहे, वेलमध्ये येणाऱ्यांना ब्लॅकलिस्ट करायचं आहे.’ हे ऐकताच बिर्लांनाही हसू फुटले. नरेंद्र मोदींचे मन विशाल, राहुल गांधी राहो खुशाल असं म्हणता मोदींना हसू लपवता आले नाही. ‘तुमचे राज्य आहे राजस्थान, लोकसभेची तुम्ही झाले शान, भारताची आम्हाला वाढवायचीय शान, ओम बिर्ला लोकसभेसाठी परफेक्ट मॅन’ अशा शब्दात आठवलेंनी आपल्या कवितेचा समारोप करताच लोकसभेत मोठा हशा पिकला आणि वातावरण प्रसन्न झालं.
काँग्रेसला कधीच सत्तेत येऊ देणार नाही : आठवले
आपल्या कवितेतून आठवलेंनी फक्त बिर्लांचे अभिनंदन केलं नाही तर काँग्रेसला चिमटेही काढले. राहुल गांधी सत्तेत असताना आपण त्यांच्यासोबत होतो. यावेळी निवडणुकांच्या आधी युपीएसोबत येता का अशी विचारणा राहुल गांधींनी आपल्याला केली होती. पण हवेची दिशा ओळखून आपण भाजपसोबतच राहिलो अशी मिश्कील टीका आठवलेंनी गांधींवर केली. ही पाच वर्षं नाही तर येणारी वर्षानुवर्षं आम्ही काँग्रेसला सत्तेत येऊच देणार नाही अशी घोषणा आठवलेंनी कवितेच्या माध्यमातून केली आणि लोकसभेत एकच हशा पिकला.
अधिक वाचा : अकोला जिल्ह्यातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola