अकोला : वैद्यकीय, अभियांत्रिकी, विधी, सीए यासारख्या अभ्यासक्रमांमध्ये पात्र आणि हुशार विद्यार्थ्यांना आरक्षणामुळे प्रवेश मिळत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊन, असे विद्यार्थी नैराश्याच्या छायेत जगत आहेत. त्यांचे आयुष्य देशोधडीला लागत आहेत. यासाठी समान नागरी कायदा करण्यात यावा. या मागणीसाठी अकोल्यातील डॉक्टर, अभियांत्रिकी, विधी या क्षेत्रातील संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
शासनाच्या अवैध आरक्षण धोरणाविरूद्ध ‘सेव मेरिट सेव नेशन’ चळवळी अंतर्गत मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. सद्यस्थितीत शासनाच्या अवाजवी व असंविधानिक आरक्षण धोरणामुळे गुणवत्ताधारक व होतकरू विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश मिळणे कठीण झालेले आहे. कारण खुल्या प्रवर्गासाठी १८ टक्के पेक्षा कमी जागा शिल्लक राहिलेल्या आहेत. गुणवत्ताविहीन विद्यार्थ्यांना त्यांच्या सोयीच्या कॉलेजमध्ये सहजरित्या प्रवेश मिळत आहे. या देशात गुणवत्तेचा सत्कार करण्याऐवजी त्याला गळफास लावण्यात येत आहे. त्यामुळे देशाची प्रगती व भविष्य अंधकारमय झाले असल्याचे संघटनांचे म्हणणे आहे.
आरक्षण पद्धती मेडिकल, इंजिनिअरिंग, विधी अशा सर्वच शैक्षणिक क्षेत्रात व नोकरीकरता कोणताही सखोल अभ्यास न करता लागू करण्यात आलेली आहे. शासनाने प्रचलित आरक्षण धोरणावर पुर्नविचार करून आवश्यक ते बदल करण्यात यावे व पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमामध्ये प्रथम जागावाढ करून गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना न्याय देण्यात यावा. तसेच कोणतीही आरक्षण पद्धती लागू करण्यापूर्वी गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी, अशी मागणी देशाच्या सर्व भागातून करण्यात येत आहे.
आजचा मोर्चा ही या चळवळीची पहिली पायरी असून गुणवत्तेला न्याय मिळेपर्यंत हा लढा असाच सुरुच राहिल, अशी माहिती आंदोलकांनी दिली. या मोर्चामध्ये शहरातील खुल्या वर्गातील डॉक्टर्स, इंजिनिअर, वकील, सी.ए, व्यवसायीक, नोकरदारवर्ग, महिला व पीडित विद्यार्थी हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. हा मोर्चा महाराणा प्रताप बाग, सिटी कोतवाली येथून निघाला.
अधिक वाचा : फॉनीः ओडिशा किनाऱ्यावर धडकलं चक्रीवादळ, हजारोंना सुरक्षितस्थळी हलव