अकोट (प्रतिनिधी): पोपटखेड मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून अकोट तालुक्यात पुनर्वसन केलेल्या ८ गावांतील अदिवासी ग्रामस्थांनी मागण्या पूर्ण न झाल्याने पुन्हा आपल्या जुन्या ठिकाणी परतण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात सोमवारी त्यांनी मेळघाट उपवनसंरक्षक कार्यालयात निवेदन देऊन पोपटखेड गेट पार करत जंगलात प्रवेश केला. रात्रभर खटकाली येथे मुक्काम केल्यानंतर आज ग्रामस्थ धारगड येथे पोहोचले. यावेळी मोठ्या प्रमाणात वन विभागाचा व पोलिसांचा ताफा तैनात होता.
मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील नागरतास, अमोना, बारुखेडा, धारगड, गुल्लरघाट, सोमठाणा, केलपणी, या गावाचे पुनर्वसन करण्यात आले. पुनर्वसनामुळे शेतजमीन गेली. जीविकेचे साधन तसेच मुलभूत सुविधा नसल्याने विविध आजाराने २७४ ग्रामस्थांचा मृत्यू झाला. आतापर्यंत कोणतेही मागण्यांची पूर्तता न झाल्याने आमच्या जुन्या बागेत परत जात असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे. आता मेलो तरी जंगलातून बाहेर निघणार नाही. शासनावर व अधिकाऱ्यांवर आमचा विश्वास नसल्याचेही ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
अदिवासी ग्रामस्थांनी आक्रमक पावित्रा घेतल्याने या ठिकाणी वनविभाग व पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला होता. मात्र, संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी गेट पायदळी तुडवीत सोबत उदरनिर्वाहाचे साधन मुलेबाळे काही जणांनी जनावरेसुद्धा सोबत घेऊन जुन्या गावाची वाट धरली. जंगलात घुसलेल्या पुनर्वसित गावकऱ्यांनी पोपटखेड पार केल्यानंतर आपला पहिला पडाव खटकाली गेट समोर टाकला.
आठ गावातील पुनर्वसित गावकरी यापूर्वी दोन वेळा जुन्या गावी परतले होते. दरम्यान, वनविभाग व महसूल विभागाने त्यांच्या आंदोलनाची दखल घेत अकोट व तेल्हारा तालुक्यातील पुनर्वसित गावासाठी निधी उपलब्ध करून देत, सोयीसुविधा व पायाभूत विकास कामांना गती देण्याचा प्रयत्न केला. महसूल प्रशिक्षण ११५ एकर जमीन पुनर्वसित गावकऱ्यांना देण्यासाठी उपलब्ध केली. शासनाने पुनर्वसित गावकऱ्यांना पुनर्वसन करताना आश्वासन देत कुठल्याही सोयीसुविधा पूर्ण केल्या नाहीत.
जमीन सर्वांना उपलब्ध नाही, रोजगाराचे साधन नाही आदी विविध अडचणी व व्यथा घेऊन अकोला येथेही ५० किलोमीटर पायपीट करत ग्रामस्थांनी आंदोलन केले होते. मात्र, यावरही तोडगा निघाला नाही. पुर्नवसित आदिवासी ग्रामस्थ धारगड येथे दाखल झाले आहेत. त्यामुळे वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह चिखलदरा, अमरावतीचे अतिरिक्त पोलीस संबंधित ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत.
अधिक वाचा : अकोल्यात चायना मांजामुळे मान कापली गेल्याने दोघे जखमी
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola