बाेरगाव मंजू- राष्ट्रीय महामार्गावर सोयाबीन फॅक्टरीसमोर निपाणाहून बोरगाव मंजू व अकोल्यात शिक्षणासाठी येत असलेल्या शाळकरी मुलांच्या अॅपेला अपघात झाला. त्यात अॅपेच्या चालकाजवळ बसलेली अकरावीची विद्यार्थिनी बाहेर फेकली गेली. आयशरच्या चाकाखाली आल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. अवैध वाहतुकीचा तालुक्यातील आठ दिवसांतील हा दुसरा बळी आहे.
निकिता चंद्रकांत राऊत, प्राजक्ता मनोज राऊत, शुभम राजेंद्र राऊत, सनवी राजेंद्र निचळ, व पूजा राजेंद्र इंगळे या विद्यार्थांना घेऊन अॅपे क्र. एमएच४०-एके०२९९ चा चालक शेषराव इंगळे निपाणाहून अकोलासाठी निघाला होता. त्यात पूजा इंगळे ही बोरगाव मंजू येथील क.बा. सोमाणी महाविद्यालयात अकरावीत शिकत असल्याने तिला बोरगाव मंजूला सोडायचे होते. मात्र बोरगाव येण्यापूर्वीच समोरून भरधाव येणाऱ्या आयशर क्र. एमएच४०-एके०२९९ ने विद्यार्थ्यांच्या अॅपेला जबरदस्त धडक दिली. यात अॅपेचा अक्षरशः चुराडा झाला. पूजा ही चालकाच्या जवळ बसलेली असल्याने ती ऑटोमधून फेकल्या गेली. इतक्यात ती आयशरच्या चाकाखाली आल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.
पूजा ही निपाणा येथील सरपंच कुमुदिनी इंगळे यांची मुलगी आहे. या अपघातात निकिता राऊत, प्राजक्ता राऊत, शुभम राऊत, सनवी निचळ हे गंभीर जखमी झाले. या विद्यार्थ्यांवर अकोला येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अपघातातील सर्व गंभीर जखमी निपाणा येथील अाहेत. या दुर्घटनेचा तपास ठाणेदार विजय मगर यांच्या मार्गदर्शनात एएसआय अशोक पितळे, नामदेव केंद्रे व प्रवीण वाकोडे करीत आहेत.
अपघात घडल्यानंतर १०८ अॅम्ब्युलन्स एक तास उशिराने पोहोचल्याने जखमी विद्यार्थांना तत्काळ उपचार मिळू शकले नाहीत. तसेच जखमींना बोरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेल्यावर डॉक्टर व नर्स उपस्थित नसल्याने त्यांच्यावर उपचार झाले नाहीत. त्यामुळे उशिराने या सर्व जखमींना अकोल्यात दाखल केले.
अधिक वाचा : 27 नोव्हेंबर पासून अकोला जिल्ह्यात गोवर व रूबेला एकत्रित लसीकरण मोहीम आयोजित
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola