अकोला : लहान मुलांना रोगप्रतिकार शक्ती कमी असल्याने ती सहजासहजी क्षयरोग, पोलिओ, धनुर्वात, घटसर्प, डांग्या खोकला, गोवर, रूबेला, हिमोफिलीयस एन्फ्लुएंझा ब, मेंदूज्वर, न्युमोनिया आदि आजारांना बळी पडतात. बालवयात होणारे रोग टाळण्याचा सर्वात प्रभावी मार्गांपैकी एक म्हणजे लसीकरण.
कोणताही रोग होण्या अगोदर त्यास प्रतिबंध करणे हाच खरा उपाय असतो. याच पार्श्वभूमिवर सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू झाली. लसीकरणामुळे टाळता येऊ शकणाऱ्या रोगांना थांबविणे आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यामध्ये महत्त्वाचे यश मिळाले आहे.
अकोला जिल्ह्याचा आरोग्य विभाग हा प्रतिबंधात्मक, उपचारात्मक, पुनर्वसनात्मक इत्यादि आरोग्य सेवा बालकांच्या जन्मापासून ते सर्व वयोगटातील लोकांना देत आहे. याच पद्धतीने भविष्यात लसीकरणाद्वारे टाळता येणाऱ्या गोवर रोगाचे उच्चाटन व रूबेला रोगावर नियंत्रण ठेवण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आले आहे.
गोवर हा अत्यंत संक्रमक, घातक व विषाणूजन्य आजार जो मुख्यत: मुलांना होतो. प्राप्त आकडेवारीनुसार भारतात दरवर्षी जवळपास ४९ हजार २०० मुले मृत्युमुखी पडतात. ताप, अंगावर पुरळ, सर्दी, खोकला, डोळे लाल होणे अशी काही गोवरची लक्षणे आहेत. रूबेला हा गोवरपेक्षा सौम्य संक्रामक आजार आहे, जो मुले आणि प्रौढ व्यक्तिंनाही होतो. परंतू, जर गर्भवती स्त्रियांना रूबेला आजाराचा संसर्ग झाला तर अचानक गर्भपात किंवा जन्मजात दोष उत्पन्न होऊ शकतात. केवळ ९ महिने (पूर्ण) ते १५ वर्षे वयोगटातील बालकांना गोवर व रूबेला प्रतिबंधक लसीची एक मात्रा दिल्यास गोवर रूबेलाची बाधा होण्याची शक्यताच उरत नाही. या अत्यंत व्यापक दृष्टीकोनातून शासनाने २०२० पर्यंत गोवर रोगाचे उच्चाटन व रूबेलावर नियंत्रण ठेवण्याचा निर्धार केला आहे. सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रमांतर्गत ९ महिने (पूर्ण) ते १२ महिने व १८ ते २४ महिने (दुसरा डोस) झालेल्या बालकांना गोवर लसीची एक मात्रा देण्यात येत असून रूबेला लसीचाही समावेश यामध्ये करण्यात आला आहे.
मात्र, आता 27 नोव्हेंबर २०१८ पासून अकोला जिल्ह्यात गोवर व रूबेला एकत्रित लसीकरण मोहीम आयोजित करण्यात आली आहे. या मोहिमेमध्ये ९ महिने ते १५ वर्षे वयोगटातील बालकांना लक्ष्य करण्यात आले आहे. जिल्ह्यात ९ महिने ते १५ वर्षे वयोगटातील 3 लाख 12 हजार 154 इतके अपेक्षित लाभार्थी आहेत. लसीकरण बुथ – प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रूग्णालय, ग्रामीण रूग्णालय, उपकेंद्र, शाळा, अंगणवाडी, मदरसा, नियमित आरोग्य सेवा सत्र इत्यादी ठिकाणी घेतली जातील. यासाठी 1 हजार 397 शाळा, 1 हजार 349 अंगणवाड्या व एकूण 3 हजार 428 नियमित आरोग्य सेवा सत्रांची ठिकाणे निवडलेली आहेत. एम.आर.लसीकरण केंद्रावर परिचारिका, आशा व अंगणवाडी कार्यकर्ती, स्वयंसेवक अशा टीम तयार करण्यात आल्या आहेत. मोहिमेमध्ये लसीकरण करून गोवर आणि रूबेला या दोन आजारापासून बालकांना सुरक्षित करू शकतो. यापूर्वी गोवर रूबेला लस दिली असेल तरीही त्यांना अतिरिक्त डोस द्यावयाचा आहे. एकाच लसीद्वारे बालकांमधील (९ महिने ते १५ वर्षे वयोगटातील) दोन आजारांचे प्रमाण कमी होऊन बालक व त्यांचे भविष्य दोन्हीही सुरक्षित राहणार आहेत. गोवर रोगाचे निर्मूलन व रूबेला नियंत्रणासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. या मोहिमेत शासनाचे विविध विभागांचे सहकार्य घेण्यात येत आहे.
मोहिमेमध्ये लसीकरण करून गोवर व रूबेला या दोन आजारांपासून आपल्या बालकाला सुरक्षित करू शकतो. यापूर्वी लस दिली असेल तरीही त्यांना अतिरीक्त डोस द्यावयाचा आहे. यामुळे बालक व त्याचे भविष्य सुरक्षित राहणार आहे.
अधिक वाचा : जिल्ह्यातील जलयुक्त शिवार योजने वर २१ कोटी खर्च; जास्त पाऊस, मात्र पाणीसाठे चिंताजनकच
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola