अकोला : युवा माहिती दूत’ या उपक्रमाचा शुभारंभ आज पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या हस्ते झाला. ‘युवा माहिती दूत’ या उपक्रमाच्या माध्यमातून शासनाच्या लोककल्याणकारी योजना तळागाळातील सर्वसामान्यांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहचून या योजनांचा लाभ नागरीकांना मिळण्यास मदत होणार असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर ‘युवा माहिती दूत’ उपक्रमाच्या लोगोचे अनावरण पालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर लोकशाही सभागृहात या उपक्रमाची ध्वनीचित्रफित दाखविण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, जिल्हा पोलिस अधिक्षक एम. राकेश कलासागर, मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास पगारे, मनपा आयुक्त जितेंद्र वाघ अन्य अधिकारी /कर्मचारी, पत्रकार, नागरीक, विदयार्थी उपस्थित होते.
युनिसेफच्या सहयोगाने तसेच उच्च शिक्षण विभाग आणि तंत्र शिक्षण विभाग व माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. पालकमंत्र्यांनी यावेळी बोलतांना या उपक्रमाद्वारे शासनाच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहचण्यास मदत होईल, असे सांगितले. प्रास्ताविक जिल्हा माहिती अधिकारी प्रमोद धोंगडे यांनी केले.
विविध शाखांमध्ये पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या महाविद्यालयातील युवकांमार्फत शासकीय योजनांची माहिती प्रस्तावित लाभार्थींपर्यंत थेटपणे पोहचविणे हे ‘युवा माहिती दूत’ उपक्रमाचे वैशिष्ट्य आहे.
आजमितीला शासकीय योजनांच्या माहितीचा प्रसार हा मुख्यत्वे वृत्तपत्रे,दूरचित्रवाणी वाहिन्या आणि रेडिओ यांच्यामार्फत केला जातो. सोशल मीडियाचा होणारा उपयोग मर्यादित स्वरुपाचा आहे. शिवाय, शासकीय योजनांचे बहुतांश प्रस्तावित लाभार्थी हे अर्धशिक्षित, दारिद्रयरेषेखालील आणि दुर्गम भागातील असल्याने वृत्तपत्रे, दूरचित्रवाणीसंच अथवा रेडिओ ही माध्यमे ते वापरतात असे नाही.
प्रस्तावित लाभार्थ्यापर्यत न पोहचणाऱ्या शासकीय योजना दुहेरी संवादातून त्यांच्यापर्यत प्रभावीपणे पोहचविण्यासाठी राज्यातील समाजकार्याची आवड असलेल्या उत्साही तरूण वर्गाचे सहाय्य घेण्याचा ‘युवा माहिती दूत’ या उपक्रमाचा महत्वाचा उद्देश आहे.
राज्यात ६ हजारपेक्षा जास्त महाविद्यालये आहेत. या महाविद्यालयामध्ये एकूण सुमारे २३ लाख पेक्षा जास्त विद्यार्थी शिकत आहेत. त्यापैकी किमान ५ ते ७ टक्के विद्यार्थी म्हणजे किमान १ लाख युवक या उपक्रमात सहभागी होतील अशी अपेक्षा आहे. यावेळी या उपक्रमाची चित्रफित उपस्थितांना दाखविण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी जिल्हा माहिती कार्यालयाचे अधिकारी नितीनकुमार डोंगरे तसेच कॅमेरामन चंद्रकांत पाटील, किसन कडू, वर्षा मसने, प्रतिक वानखडे यांनी प्रयत्न केले.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola