गडचिरोली : किर्र जंगल, धो-धो बरसणारा पाऊस, खाली उडी मारावी तर समोर साक्षात मृत्यू… अशा विचित्र परिस्थितील एका आदिवासी इसमाने पूर आलेल्या नाल्याच्या मध्यभागी असलेल्या एका झाडावर दोन रात्री आणि एक दिवस असे ३६ तास काढले. पोटात पाणी आणि अन्नाचा एक कणही नसताना नैसर्गिक आपत्तीला परतावून लावणाऱ्या या इसमाचे नाव आहे दलसू पोदाडी. भामरागड तालुक्यातील लाहेरी गावापलीकडच्या अनेक गावांचा पावसाळ्यात संपर्क तुटतो. लाहेरी आणि गुंडेनूर गावाच्यामध्ये एक नाला आहे. नाल्यावर पुलाचे बांधकाम सुरु आहे. परंतु, पावसाळा असल्याने बांधकाम बंद आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना लाकडी बोटीच्या साह्याने नाला ओलांडावा लागतो.
गुंडेनूर येथील विलास पुंगाटी व दलसू पोदाडी हे रविवारी (ता.८) लाहेरी येथील आठवडी बाजार आटोपून गुंडेनूर गावाकडे जाण्यास निघाले. वाटेतील नाल्याला पूर आला होता. शिवाय पाऊसही पडत होता. दोघेही लाकडी बोटीत बसून नाला ओलांडत होते. परंतु अचानक प्रवाह वाढल्याने बोट उलटली. दोघेही पाण्यात पडले. विलास पुंगाटी हा कसाबसा पोहून बाहेर पडला. परंतु दलसू पोदाडी प्रवाहात वाहून गेला. विलास गुंडेनूर गावात पोहचल्यानंतर दुसऱ्या दिवशी ९ तारखेला त्याने गावकऱ्यांना घटनेची माहिती दिली.
मात्र, रविवारपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने दलसू पोदाडी हा पुरात वाहून गेला असावा, असे गावकऱ्यांना वाटले. मंगळवारी ( ता. १०) सप्टेंबरला पावसाने थोडी विश्रांती घेताच सकाळी ९ वाजताच्या सुमारास गावकरी दलसू पोदाडीचा शोध घेण्यासाठी गुंडेनूर नाल्याकडे गेले. गावकरी शोध घेत असतानाच नाल्याच्या मध्यभागी असलेल्या एका झाडावरुन एका इसमाने जोराने आवाज दिला. काही जणांनी गावात जाऊन बचाव साहित्य आणले. इकडे भामरागडचे तहसीलदार किशोर बागडे यांनीही कोतवाल आणि स्थानिक आपदा मित्रांना घटनास्थळी पाठविले. तब्बल दीड तास गावकऱ्यांनी रेस्क्यू ऑपरेशन राबवून दलसूला पुरातून बाहेर काढले.
दोन रात्री आणि एक दिवस असे तब्बल ३६ तास दलसू पोदाडीने पुराच्या विळख्यातील झाडावर बसून काढले. पाणी नाही, अन्न नाही, अशा स्थितील घनदाट जंगलात, धो-धो पावसात दलसूने नैसर्गिक आपत्तीशी दोन हात केले. शिवाय गावकऱ्यांनीही स्वत:च्या जिवाची पर्वा न करता त्याला बाहेर काढले. दलसूचे वडील याच नाल्यात वाहून गेले होते. दिवाळीनंतर गुंडेनूरनजीकच्या नाल्यातील पाणी कमी होताच नागरिक श्रमदानातून बांबूचा पूल तयार करुन मार्गक्रमण करतात. परंतु पावसाळ्यात जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो. काही वर्षांपूर्वी दलसूचे वडील अडवे पोदाडी यांचा याच नाल्यात वाहून गेल्याने मृत्यू झाला होता. परंतु , मुलगा मात्र बचावला.