प्रसिद्ध गझल गायक पंकज उधास यांचे सोमवारी (दि. 26) वयाच्या 72 व्या वर्षी निधन झाले. वयाच्या 72 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांची मुलगी नायब हिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून वडिलांच्या निधनाची माहिती दिली. पंकज उधास यांच्या गझल देशाबरोबरच परदेशातही खूप पसंत केल्या गेल्या. चिठ्ठी आयी है या गाण्याने त्यांना जगभरात ओळख मिळाली. नायब यांनी पोस्टमध्ये म्हटलं की, ‘अत्यंत जड अंतःकरणाने आम्ही तुम्हाला कळवत आहोत की, पद्मश्री पंकज उधास यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे.’
पंकज उधास यांच्या निधनाचे वृत्त समजल्यानंतर संगीत विश्वात शोककळा पसरली आहे. त्यांच्यासारख्या गझल गायकाच्या जाण्याने चाहत्यांनाही अतीव दु:ख झाले आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री योगी आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही पंकज उधास यांच्या निधनावर भावनिक संदेश पोस्ट केला आहे. पंकज उधास यांच्या निधनाने संगीत विश्वात एक पोकळी निर्माण झाली आहे जी कधीही भरून निघणार नाही, असे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे.
पीएम मोदी यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटलंय की, भारतातील सर्वात प्रतिष्ठित गझल गायकांपैकी एक असलेले पंकज उधास यांच्या निधनाने दु:ख होत आहे. आम्ही त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करतो. त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. पंकज उधास यांनी गायलेल्या गझल थेट आत्म्याशी भिडल्या. ते भारतीय संगीताचे दीपस्तंभ होते. त्यांचे सुर पिढ्यानपिढ्या अखंड प्रवास करत राहतील. मला या क्षणी मला त्यांच्यासोबत केलेल्या विविध संभाषणांची आठवण होत आहे. पंकज उधास यांच्या निधनाने संगीत विश्वात कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे. या दु:खद प्रसंगी आम्ही त्यांच्या कुटुंबियासोबत आहोत. पंकज उधास यांना भावपूर्ण श्रद्धांजली..’
सीएम योगी आणि केंद्रीय मंत्री गडकरी काय म्हणाले?
गायक पंकज उधास यांच्या निधनावर, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शोक व्यक्त केला आहे. ते म्हणता की, ‘पद्मश्री पंकज उधास यांच्या निधनाने खूप दुःखी आहे. त्यांच्या जाण्याने संगीत जगताचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे. त्यांच्या शोकाकुल कुटुंबियांना हे अपार दु:ख सहन करण्याची शक्ती देवो हीच प्रभू श्री राम चरणी प्रार्थना.’ त्याचवेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, प्रसिद्ध गझल गायक पंकज उधास यांच्या निधनाची बातमी दुःखद आहे. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. गझलच्या दुनियेतील एक मोठे नाव पंकज जी यांनी आपल्या गाण्यांनी लोकांच्या मनावर राज्य केले. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबाला दु:ख सहन करण्याची शक्ती देवो.
पंकज यांचा गुजरातमधील जेतपूर गावात जन्म
पंकज उधास यांचा जन्म 17 मे 1951 रोजी गुजरातमधील जेतपूर या छोट्याशा गावात झाला. जमीनदार कुटुंबातील पंकज त्यांच्या तीन भावांमध्ये सर्वात लहान होते. राजकोटजवळील चरखडी या गावात त्यांचे कुटुंब राहायचे. पंकज उधास यांचे आजोबा गुजरातच्या भावनगर राज्याचे दिवाण म्हणून कार्यरत होते. पंकज यांचे वडील केशुभाई उधास सरकारी सेवेतून निवृत्त झाले होते आणि त्यांना इसराज हे वाद्य वाजवण्यात रस होता. तर आई जीतुबेन यांनाही गाण्याची खूप आवड होती. आईच्या प्रेरणेने पंकज उधास गाणे शिकले, त्यामुळे पंकजसोबत त्यांच्या भावांनाही संगीताची आवड निर्माण झाली.
चिठ्ठी आयी है’ या गझलेने रातोरात मिळाली होती प्रसिद्धी
पंकज उधास यांचे गझल गायनाच्या जगात मोठे नाव आहे. ‘चिठ्ठी आयी है’ या गझलेने त्यांना रातोरात प्रसिद्धी मिळाली होती. 1986 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘नाम’ चित्रपटात या गझलचा समावेश करण्यात आला होता. पंकज यांनी ‘ये दिल्लगी’, ‘फिर तेरी कहानी याद आयी’, ‘चले तो कट ही जायेगा’ आणि ‘तेरे बिन’ अशा अनेक गझलांना आपला आवाज दिला.