अकोला दि.7 :– जिल्ह्यातील कोरोना विषाणू संसर्गाच्या सद्यस्थिती व उपाययोजनासंदर्भात आज जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आढावा घेतला. कोविड चाचण्या, ऑक्सीजन बेड, औषधी व उपचार सुविधेबाबत प्रशासनाने सज्ज राहावे, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात कोविड उपाययोजना संदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, डॉ. सुरेश असोले, डॉ. मुंकूद अष्टपुत्रे, जिल्हा स्त्री रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. आरती कुलवाल, डॉ. अनुप चौधरी, डॉ. विनोद करंजीकर, तालुका आरोग्य अधिकारी आदि उपस्थित होते.
जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी निर्देश दिले की, कोविड संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन आरोग्य विभागाने उपचार सुविधा उपलब्धतेबाबत नियोजन करावे. त्याअनुषंगाने खाटा, औषधी व गरज भासल्यास ऑक्सिजन आदींची पुर्वतयारी करुन घ्यावी. प्रशासनाव्दारे मॉक ड्रिलव्दारे पडताळणी केल्या जाईल. तसेच शासकीय महाविद्यालय, जिल्हा स्त्री रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रात फायर ऑडीट करुन घ्यावे, असेही निर्देश देण्यात आले.