अकोला दि.२८ :- महिलांची प्रगती व स्वावलंबनासाठी अद्यापही खूप काम करण्याची गरज आहे. त्यासाठी समाजातील सर्व घटकांनी पुढे यावे व सर्वांच्या सहयोगाने हे कार्य पुढे न्यावे,असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आज येथे केले.
महिला व बालविकास विभागातर्फे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराचे वितरण आज जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या हस्ते करण्यात आले. लोकशाही सभागृहात पार पडलेल्या सोहळ्यास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विलास मरसाळे, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने, जिल्हा परिविक्षा अधिकारी गिरीश पुसदकर आदी मान्यवर उपस्थित होते.
या पुरस्कार वितरण सोहळ्यात डॉ. निर्मला पुंडलिक भामोदे, खुशबु महादेव चोपडा, ॲड. मनिषा नरेंद्र धुत, स्नेहा चक्रधर राऊत यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यात सन २०१३-१४ ते २०१८-१९ या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. त्यात दहा हजार रुपये रोख, स्मृतीचिन्ह व शाल श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
जिल्हाधिकारी श्रीमती अरोरा म्हणाल्या की, महिलांच्या स्वावलंबनासाठी अद्यापही खूप कार्य करण्याची गरज आहे. त्यासाठी महिलांनीच पुढे यावे. महिलांसाठी वेगवेगळ्या क्षेत्रात खूप संधी आहेत. त्यासाठी महिलांनी स्वतःला सक्षम व समर्थ बनवावे,असे त्यांनी सांगितले. सौरभ कटियार यांनी पुरस्कार प्राप्त महिलांचे अभिनंदन केले. प्रास्ताविक गिरीश पुसदकर यांनी केले. तर विलास मरसाळे यांनी आभार मानले.