अकोला, दि.8 :- जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालयात महिलांसाठी पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आले होते. या मेळाव्यास महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत भरती प्रक्रियेसाठी 153 उमेदवारांनी सहभाग नोंदविला. यामध्ये निवडप्रक्रियेनंतर 72 जणांची प्राथमिक निवड करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा रोजगार स्वयंरोजगार व कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त द.ल. ठाकरे यांनी दिली.
जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि अकोला शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्यावतीने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात 1) सनसाईन इंजिनिअरिंग अकोला, 2) ट्रेड कार्ट डिजीटल प्रा.लि. अकोला, 3) धुत ट्रान्समिशन फलोरा औरंगाबाद, 4) कल्याणी टेक्नोफोर्ज प्रा.लि. चाकण पुणे, 5) निपूण मल्टीसर्व्हीसेस औरंगाबाद व पूणे 6) जबल सर्किट प्रा.लि. रांजनगाव, 7) भारतीय जीवन विमा निगम, अकोला या कंपण्यानी सहभाग नोंदविला. यामध्ये 228 पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली. भरती प्रक्रियेसाठी 153 उमेदवारांनी आपला सहभाग नोंदविला. त्यात निवडप्रक्रियेनंतर 72 जणांची प्राथमिक निवड करण्यात आली.
उमेदवारांकरीता रोजगार मेळाव्याच्या ठिकाणीच नोंदणीकरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी निमा अरोरा, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा रोजगार स्वयंरोजगार व कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त द.ल. ठाकरे, सूचना प्रसारण अधिकारी अनिल चिंचोले यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. तसेच जिल्हा रोजगार स्वयंरोजगार व कौशल्य विकास विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.