अकोला दि.२७ :- ‘मानवता हे एकच तत्व मानून मी जगतो’, असे तात्यासाहेब म्हणत, त्यांची जीवन निष्ठा हि माणसाशी निगडीत असल्याने कुसुमाग्रजांच्या साहित्यातून माणुसपणाचा हुंकार उमटतांना दिसतो. त्यांच्या साहित्यात नेहमीच माणसांचा आणि माणूसपणाचा शोध दिसतो, असे प्रतिपादन श्रीमती सीमा शेट्ये-रोटे यांनी आज येथे केले.
ज्ञानपीठ विजेते साहित्यीक वि.वा. शिरवाडकर उपाख्य कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. यानिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात विदर्भ साहित्य संघाच्या कार्याध्यक्ष श्रीमती सीमा शेट्ये रोठे यांचे व्याख्यान झाले. नियोजन भवनात पार पडलेल्या या कार्यक्रमास अपर जिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, मराठी भाषा अधिकारी सदाशिव शेलार, उपजिल्हाधिकारी बाबासाहेब गाढवे, मराठी भाषा समितीचे अशासकीय सदस्य सुरेश पाचकवडे, श्याम ठक, डॉ. विनय दांदळे, ॲड. मयुर लहाने हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. ‘कुसुमाग्रजांची प्रेरक जीवनदृष्टी’ या विषयावर श्रीमती शेट्ये यांनी आपले विचार व्यक्त केले.
श्रीमती शेट्ये म्हणाल्या की, राम गणेश गडकरी यांचा विष्णू वामन शिरवाडकर अर्थात वि.वा. शिरवाडकर यांच्यावर प्रभाव होता. त्यातूनच त्यांनी गडकऱ्यांच्या ‘गोविंदाग्रज’ प्रमाणे ‘कुसुमाग्रज’ हे नाव धारण केले. या नावानेच ते कविता लेखन करु लागले. त्यांच्या कविता ह्या वि.स.खांडेकर यांच्यापर्यंत पोहोचल्या. लघुनिबंध, कविता, नाटके, कादंबऱ्या असे विविध साहित्यप्रकार त्यांनी हाताळले. श्रीमती शेट्ये म्हणाल्या की, त्याकाळी ‘गर्जा जयजयकार…’ ह्या क्रांतीगीताने प्रेरित होऊन अनेक जणांनी स्वातंत्र्य संग्रामात सहभाग घेतला. संत ज्ञानेश्वर ते संत तुकाराम ह्यांची सत्प्रवृत्ती त्यांच्या साहित्यात दिसते. लिखाणातून सोज्वळता झळकते. ते नेहमीच म्हणत ‘ते स्वतः सर्वसामान्यांपैकीच एक आहेत’. त्यांनी सदैव आपल्या साहित्यातून माणसांचा शोध घेतला. पौराणिक कथांमधूनही ते माणसांचा शोध घेत. त्यांनी पुढे सांगितले की, सात्विकता, सोज्वळता यासोबतच त्यांच्या लिखाणातून उपरोध हा गुणही दिसतो. स्वातंत्र्याचा उद्घोष हा त्यांच्या साहित्याचा स्थायिभाव होता. त्यांच्या कविता ह्या सामाजिक संवाद साधणाऱ्या होत्या. ते विषमतेतील कारुण्य टिपत. माती- आकाश यासारख्या भव्य प्रतिमांचा वापर करीत. एका अर्थाने ते प्रकाशपूजक होते. म्हणूनच त्यांची कविता ही नेहमीच आशावादी असल्याचे दिसून येते,असेही श्रीमती शेट्ये यांनी सांगितले. श्रीमती शेट्ये यांनी आपल्या व्याख्यानात कुसुमाग्रजांचे लघुनिबंध, कविता, नाटके, कादंबऱ्या अशा विविध साहित्यप्रकारांचा आढावा घेतला.
या कार्यक्रमात ॲड मयुर लहाने व सुरेश पाचकवडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. याच कार्यक्रमात मराठी भाषा संवर्धन पंधरवाड्यात आयोजित विविध कार्यक्रमातील विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
पारितोषिक विजेत्या विद्यार्थ्यांची नावे-शिवाजी महाविद्यालय- मयुरी राजेश वाहाणे, स्वराज समदूर, ओम पातोळे, कोठारी कॉन्व्हेंट स्कूल- गौरी प्रसाद देशपांडे, तन्मय माधव जऊळकर, सार्थक लक्ष्मीकांत बाजड, मनपा शाळा क्रं.१६- श्रावणी कान्हेड, मनपा शाळा क्र.७- आश्विन मोरे, मनपा शाळा क्र.२६- साक्षी गवई, महाराष्ट्र माध्यमिक शाळा- राधिका सुनिल अग्रवाल, स्कुल ऑफ स्कॉलर्स- नेहल ठाकुर, संभाजी काळे, पोद्दार स्कूल- उन्नती पवार,जागृती विद्यालय- समुहगीत गायन, सामर्थ्य फाऊंडेशन- रुतिका गणेश जंगले, दीपा रामभाऊ शहा, नम्रता रवि तायडे.
प्रास्ताविक सदाशिव शेलार यांनी तर सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन किशोर बळी यांनी केले. कार्यक्रमास जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी- कर्मचारी, विद्यार्थी, पालक, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते