ढासळत्या आर्थिक स्थितीमुळे रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank of India) ५ सहकारी बँकांवर निर्बंध लादले आहेत. यात महाराष्ट्रातील दोन बँकांचा समावेश आहे. या बँकांतून पैसे काढण्यावर निर्बंध लावले आहेत. हे निर्बंध सहा महिन्यांसाठी कायम राहतील, असे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) शुक्रवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
हे निर्बंध लागू असताना या बँका आरबीआयच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणालाही कर्ज देऊ शकत नाहीत. तसेच कोणतीही गुंतवणूक करू शकत नाहीत. कोणतेही दायित्व घेऊ शकत नाहीत आणि त्यांच्या कोणत्याही मालमत्तेचे हस्तांतरण करु शकणार नाहीत.
HCBL सहकारी बँक, लखनौ (उत्तर प्रदेश), आदर्श महिला नागरी सहकारी बँक मर्यादीत, औरंगाबाद (महाराष्ट्र), शिमशा सहकारी बँक नियामिथा, मड्डूर, मांड्या, कर्नाटक या तीन बँकांचे ग्राहक सध्याच्या आर्थिक स्थितीमुळे त्यांच्या खात्यातून पैसे काढू शकणार नाहीत. तर उरावकोंडा को-ऑपरेटिव्ह टाऊन बँक, उरावकोंडा, (अनंतपूर जिल्हा, आंध्र प्रदेश) आणि शंकरराव मोहिते पाटील सहकारी बँक, अकलूज (महाराष्ट्र) चे ग्राहक ५ हजार रुपयांपर्यंतच पैसे काढू शकतात.
पाचही सहकारी बँकांचे ठेवीदार ठेव विमा आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनकडून त्याच्या ठेवींच्या ५ लाखांपर्यंतच्या ठेव विमा दाव्याची रक्कम मिळण्यास पात्र असतील, असेही RBI ने निवेदनात म्हटले आहे. हे निर्देश म्हणजे आरबीआयने बँकिंग परवाना रद्द केला आहे असे समजू नये, असेही त्यात म्हटले आहे.