अकोला,दि.20 :– छत्रपती शिवाजी महाराज हे धाडसी, शूर, दूरदृष्टीचे तसेच मोठ्या मनाचे राजे होते. त्यांचे हेच सर्व गुण पालकांनी आपल्या मुलांमध्ये संस्कार व शिकवणीच्या माध्यमातून रुजवावे, असे आवाहन संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अभ्यासक्रम मंडळाच्या अध्यक्ष डॉ. ममता इंगोले यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात डॉ. इंगोले बोलत होत्या.
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त लोकशाही सभागृहात अभिवादन करण्यात आले. अपर जिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) सदाशिव शेलार, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कला वाणिज्य शाखा अभ्यासक्रम मंडळाच्या अध्यक्ष डॉ. ममता इंगोले आदी मान्यवर उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन उपस्थितांनी अभिवादन केले. महाराष्ट्र शासनाने राज्यगीत म्हणून घोषित केलेल्या ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ या गीताचे सादरीकरण झाले. साहेबराव मोर्डे यांनी गीत गायन केले. त्यानंतर सृजन बळी या विद्यार्थ्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा एक पोवाडा सादर केला.
डॉ. ममता इंगोले यांनी सांगितले की, नेता कसा असावा? याचे उत्तम उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होत. महाराजांचे दूरदृष्टी, जलव्यवस्थापन, स्त्री सन्मान, परधर्मियांचा आदर करण्याची वृत्ती, कल्पकता, धडाडी हे सर्व गुण आजही आचरणात आणावे असे आहेत. त्यांच्या या गुणांचे संस्कार घराघरात आई वडीलांनी आपल्या मुलांवर करावे, असे आवाहन त्यांनी केले.
प्रास्ताविक उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार यांनी केले. सुत्रसंचालन व आभारप्रदर्शन किशोर बळी यांनी केले. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.