अकोला दि.१६ :- जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या वाचन कक्षात मराठी भाषा संवर्धन पंधरवाड्यानिमित्त सुरु करण्यात आलेल्या ‘वाचन कट्टा’ या उपक्रमाचा लाभ सगळ्यांनी घ्यावा,असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी केले.
येथील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात सुरु करण्यात आलेला वाचन कट्टा उपक्रमाची आज सुरुवात करण्यात आली. याठिकाणी विविध विषयांवरील पुस्तके वाचनासाठी ठेवण्यात आली आहेत. दिवसभरात कुणीही वाचक जाऊन ही पुस्तके वाचू शकतात. या उपक्रमाचे उद्घाटन निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने, समन्वयक गजानन महल्ले, जिल्हा ग्रंथालय अधिकारी मनोज वानखडे, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष श्यामराव वाहुरवाघ, कैलास गव्हाळे आदी उपस्थित होते.
जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या वाचनकक्षात हा वाचन कट्टा सुरु करण्यात आला आहे. प्रास्ताविकात जिल्हा ग्रंथालय अधिकारी मनोज वानखडे यांनी सांगितले की, जिल्हा ग्रंथालयात १ लाख ७५ हजार पुस्तके आहेत. ही पुस्तके वाचनासाठी उपलब्ध असतात. त्याचा वाचकांनी लाभ घ्यावा. येथील वाचन कक्ष शनिवार, रविवार या सुटीच्या दिवशीही सुरु ठेवण्यात येतो. त्याचाही वाचकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी स्पर्धा परीक्षार्थिंना वाचनाचे महत्त्व सांगितले. वाचनातून आपण समृद्ध होतो. वाचनाने विचारांना चालना मिळून व्यक्तिमत्वाचा विकास होतो. त्यासाठी वाचन हि महत्त्वाची प्रक्रिया असून प्रत्येक नागरिकाने दिवसाचा काही वेळ वाचनात घालविला पाहिजे. मराठी भाषा ही एक समृद्ध भाषा असून या भाषेत सर्व प्रकारचे ज्ञान, माहिती, सकस साहित्य उपलब्ध आहे. त्याचा लाभ सगळ्यांनी वाचनकट्टा या उपक्रमाद्वारे घ्यावा,असे आवाहन त्यांनी केले.
उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. दुसाने यांनीही यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कैलास गव्हाळे यांनी सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन केले.