अकोला,दि. 28:- कोरोनाच्या प्रतिबंधासाठी लसीकरण करणे हा सर्वोत्तम उपाय आहे. खबरदारीचा उपाय म्हणून कोरोना प्रतिबंधक नियमांचे स्वयंशिस्तीने पालन करीत लसीकरण करा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी यांच्या दालनात मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्ह्यातील कोरोना संदर्भातील आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा परिषदचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश असोले, माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. विनोद करंजीकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. एम.डी. अष्टपुत्रे, डॉ. एन.ए. अंभोरे आदि उपस्थित होते.
चीनमध्ये रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून देशांमध्ये कोरोनाचा प्रादूर्भाव दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना नियमाचे पालन करणे आवश्यक आहे. सोबतच लसीकरणाचे तिन्ही डोस घेणे आवश्यक आहे. प्रिकॉशन डोसचे प्रमाण अत्यल्प असून लसीकरण वाढवणे आवश्यक आहे. विशेषतः 60 वर्षांवरील नागरिकांनी लसीकरण प्राधान्याने करावे. लसीकरण हाच कोरोनापासून बचावाचा मार्ग आहे. तसेच रुग्णालयातील खाटांची उपलब्धता, आवश्यक औषधांची उपलब्धता, कोरोनाची तपासणी, ॲम्ब्युलन्सची उपलब्धता, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्स, टेलिमेडिसिन सेवा, मनुष्यबळाची उपलब्धता आदींचा आढावा मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार यांनी घेतला. सर्दी, ताप, खोकला ही लक्षणे आढळल्यास तातडीने चाचणी करुन घ्यावी, असेही आवाहन यावेळी केले.
जिल्ह्यामध्ये लसीकरणाची सद्यास्थिती
हेल्थ केअर वर्कस पहिला डोस- 13,748(99.18%) दुसरा डोस- 12,749(91.98%), तिसरा डोस- 4,252(30.68%) एकूण 30,749 डोस.
फ्रन्ट लाईन वर्कस पहिला डोस- 14, 278(100%) दुसरा डोस- 13,894(98.91%), तिसरा डोस- 4,161 (29.59%) एकूण 32,333 डोस.
वयवर्ष 12-14 वयोगट पहिला डोस-35,772(58.25%),दुसरा डोस-20,809(33.88%) एकूण 56,581 डोस.
वयवर्ष 15-17 वयोगट पहिला डोस- 50,856(53.52%) दुसरा डोस- 34,671(36.49%)एकूण 85,527 डोस.
वयवर्ष 18 वरील सर्व पहिला डोस- 11,23,563(78.41%) दुसरा डोस- 8,05,024(56.18%), तिसरा डोस- 1,02,037(7.12%) एकूण 20,30,624 डोस.
हेल्थ केअर, फ्रन्ट लाईन वर्कस व 12 वर्षावरील सर्व वयोगटातील लसवंताना पहिला डोस 12,38,217(77.90%) दुसरा डोस 8,87,147(55.82%) तर तिसरा डोस 1,10,450(6.95%) असे एकूण 22,35,814 डोस देण्यात आले, अशी माहिती जिल्हा परिषदचे माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. विनोद करंजीकर यांनी दिली.