अकोला दि. 21 :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत द्यावयाच्या शिष्यवृत्ती व अन्य योजनांचा लाभ महाडीबीटी प्रणालीद्वारे दिला जातो. त्यासाठी शैक्षणिक वर्ष 2022-23 मधील नवीन अर्ज व अर्जांचे नुतनीकरण महाविद्यालयस्तरावर प्रलंबित आहेत. अशा महाविद्यालयांनी आपल्यास्तरावर प्रलंबित अर्ज निकाली काढण्याची कार्यवाही करावी, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाजकल्याण डॉ. अनिता राठोड यांनी केले आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत महाडिबीटी प्रणालीवर अनुसूचित जाती, वि.जा., भ.ज., इमाव. व विशेष मागास प्रवर्गाकरीता भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, मॅट्रिकोत्तर शिक्षण फी, परीक्षा फी प्रदाने, राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यावसायिक पाठ्यक्रमाशी संलग्न वसतीगृहातील विद्यार्थ्यांना विद्यावेतन, व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना राबविल्या जातात.
माहिती व तंत्रज्ञान विभागामार्फत सन 2022-23 या शैक्षणिक वर्षातील महाडिबीटी पोर्टलवर अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील नविन व नुतनीकरणाचे वरील योजनांचे अर्ज भरण्याची सुविधा दि. 21 सप्टेंबर 2022 पासून उपलब्ध करून देण्यात आली आहे. या अनुषंगाने अकोला जिल्ह्यात अनु.जाती प्रवर्गातील 8486 तर विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील 10705 आवेदन पत्रे नोंदणीकृत झालेली आहे. महाडिबीडी पोर्टलवर नोंदणी झालेले अर्जाची संख्या सरासरीच्या प्रमाणापेक्षा अत्यल्प असून महाविद्यालयस्तरावर प्रलंबित आहे. तथापि सर्व संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य/कर्मचारी यांनी महाविद्यालयस्तरावर प्रलंबित अर्जाची पडताळणी करून पात्र अर्ज https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर अर्ज नोंदणीकृत करावे. पात्र मागासवर्गीय विद्यार्थी लाभापासून वंचित राहणार नाही याची दक्षता संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य व पात्र विद्यार्थांनी घ्यावी, असे समाजकल्याणचे सहाय्यक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी कळविले आहे.