अकोला,दि. 3 :- एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान सन 2022-23 मनुष्यबळ विकास कार्यक्रमातर्गंत शेतकऱ्यांना प्रत्यक्ष प्रक्षेत्रावर प्रशिक्षण दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. याकरीता अकोट उपविभागातंर्गत अकोट, तेल्हारा, बाळापुर, पातुर तालुक्यातील इच्छुक शेतकऱ्यांनी दि. 10 नोव्हेंबरपर्यत अर्ज करावा, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी एस. एस. शिंदे यांनी केले आहे.
फलोत्पादन तसेच कृषी क्षेत्राशी निगडीत काम करणाऱ्या संशोधन संस्था जसे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, पुणे, अहमदनगर, नाशिक, सोलापूर या जिल्हामध्ये भारतीय अनुसंधान परिषद (ICAR) अद्यावत कृषी विज्ञान केंद्र तसेच कृषी विद्यापीठे फलोत्पादन पिकांबाबत कार्यरत आहेत. तसेच फलोत्पादन आणि प्रक्रिया क्षेत्रात काम करणारे शेतकरी, प्रक्रिया केंद्र याठिकाणी भेट देवून प्रत्यक्ष माहिती घेण्यासाठी अनुदानावर 90 शेतकरी प्रशिक्षणार्थ्यांचे पाच दिवसीय शेतकरी अभ्यास दौरा व प्रक्षेत्र प्रशिक्षणाचे नियोजन अकोट उपविभागीय कृषी अधिकारी यांच्या मार्फत आयोजित करण्यात आले आहे. याकरीता इच्छुक शेतकऱ्याकडून अर्ज मागविण्यात येत आहे. प्रक्षेत्र प्रशिक्षण दौऱ्यासाठी ज्या शेतकऱ्यांनी फळबाग लागवड, कांदा चाळ, संरक्षित शेती, प्राथमिक प्रक्रिया इत्यादीचा लाभ घेतलेला आहे किंवा लाभ घेवू इच्छित असलेल्या शेतकऱ्यांना प्रक्षेत्र प्रशिक्षण अभ्यास दौऱ्यासाठी अर्ज करता येईल. शेतकऱ्यांनी अर्ज संबधित गावाच्या कृषी सहाय्यकामार्फत किंवा स्वत: तालुका कृषी अधिकारी कार्यालयास संपूर्ण माहितीसह दि. 10 नोव्हेंबरपर्यत अर्ज करावा, असे आवाहन एस. एस. शिंदे यांनी केले आहे.