अकोला दि.21 स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशु विज्ञान संस्था, अकोला येथील पदयुत्तर विद्यार्थी डॉ. परीक्षित कातखेडे यांना अश्वातील थायलेरिओसिस रोगावरील संशोधनाबद्दल युवा वैज्ञानिक पुरस्कार गुजरात येथील कामधेनु विश्वविद्यालयाचे कुलगुरू डॉ. एन एच केलावाला यांच्या हस्ते देण्यात आला.
महाराष्ट्र पशु व मस्त्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर अंतर्गत येणाऱ्या स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशु विज्ञान संस्था, अकोला येथील प्रा. डॉ. सुनील वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली अश्वातील गोचीडा मार्फत प्रसारित होणाऱ्या भयंकर अश्या थायलेरिओसिस रोगाचा प्रादुर्भाव, निदान आणि उपचारा बद्दल पदयुत्तर विद्यार्थी डॉ. परीक्षित कातखेडे यांनी संशोधन केले. संशोधनावरील शोध प्रबंधाचे नुकतेच गुजरात राज्यातील आनंद येथील कामधेनु विश्वविद्यालय द्वारा आयोजित केलेल्या राष्ट्रीय परिसंवाद आणि पशुवैद्यकीय आंतर आणि प्रतिबंधात्मक औषधी सोसायटीचे वार्षिक अधिवेशनात डॉ परीक्षित कातखेडे यांनी युवा वैज्ञानिक प्रतियोगिता सत्रात सादरीकरण केले. या शोध प्रबंध सादरीकरणास डॉ परीक्षित कातखेडे यांना युवा वैज्ञानिक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी हेस्टर कंपनीचे सोईओ डॉ राजीव गांधी, व्हीआयपिएम संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माफसूचे विस्तार शिक्षण संचालक प्रा डॉ अनिल भिकाने, सचिव डॉ अशोक कुमार, डॉ डी. बी. पाटील, डॉ पी. एच. टांक व डॉ. सुनंत रावल आदी उपस्थित होते. वार्षिक अधिवेशनात डॉ परीक्षित कातखेडे यांना स्व. वर्गीस कुरियन उत्कृष्ट क्षेत्रीय पशुवैद्यक आणि डॉ रवींद्र हातझाडे यांना उत्कृष्ट क्षेत्रीय पशुवैद्यक तसेच पदव्युत्तर विद्यार्थी डॉ सारंग भस्मे यांना घोड्यातील धनुर्वात आणि थैलेरिअसिस रोगाच्या चिकीत्सालयीन अहवाल उत्कृष्ट सादरीकरण केल्याबद्दल पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. राष्ट्रीय स्तरावर स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशु विज्ञान संस्थेला मान मिळवून दिल्याबद्दल डॉ परीक्षित कातखेडे, डॉ रवींद्र हातझाडे आणि डॉ. सारंग भस्मे यांचे महाराष्ट्र पशु व मस्त्य विज्ञान विद्यापीठ, नागपूरचे कुलगुरू डॉ. आशीश पातुरकर, संचालक शिक्षण डॉ शिरीष उपाध्ये, संचालक संशोधन डॉ नितिन कुरकुरे, संस्थेचे सहयोगी अधिष्ठाता डॉ धनंजय दिघे, डॉ सुनील वाघमारे तसेच सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले.