अकोला, दि. 23: सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने महिलांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी नवरात्रोत्सव कालावधीत ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियान’(दि. 26 सप्टेंबर ते 5 ऑक्टोंबर) राबविण्यात येणार आहे. या अभियान कालावधीत जिल्ह्यातील 18 वर्षावरील महिला, माता यांच्या सर्वागीन तपासण्या करण्यात येणार आहे. हा अभियान यशस्वी करण्यासाठी सर्वानी प्रयत्न करा, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियानाबाबत आढावा बैठक पार पडली. यावेळी विधानपरिषदचे आमदार वसंत खंडेलवाल, जिल्हा परिषदचे अध्यक्ष प्रतिभाताई भोजने, मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश असोले, महिला व बाल विकास अधिकारी विलास मरसाळे, कुष्ठरोग अधिकारी डॉ. मनिष शर्मा, माता व बाल संगोपण अधिकारी विनोद करंजीकर, विभाग प्रमुख, तालुका आरोग्य अधिकारी आदि उपस्थित होते.
आमदार वसंत खंडेलवाल म्हणाले की, नवरात्रोत्सव कालावधीत माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियानाची माहिती शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांना व्हावी याकरीता जनजागृती करावी. या अभियानात जास्तीत जास्त महिलांचे आरोग्य तपासण्या होईल याकरीता नियोजन करा, असेही निर्देश त्यांनी दिले.
जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभाताई भोजने म्हणाले की, ग्रामीण भागामधील महिला व माता आरोग्याविषयी गंभीर नसतात. त्यामुळे त्यांना गंभीर आजाराला सामोरे जावे लागतात. या अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांचे आरोग्य तपासण्या होणार असून यांचा निश्चितच महिलांना लाभ होईल, असे प्रतिपादन त्यांनी केले.
अभियानात सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत 18 वर्षावरील महिलांची तपासणी केली जाणार आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात दररोज माता आणि महिलांच्या तपासणीची शिबिर घेण्यात येतील. उपकेंद्र आणि आरोग्यवर्धिनी केंद्र स्तरावर समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांमार्फत मातांची तपासणी, समुपदेशन कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. ग्रामीण रुग्णालय आणि त्यावरील रुग्णालयात स्त्री रोगतज्ज्ञांमार्फत तपासणी करण्यात येणार आहे. या कालावधीत मानवविकास कार्यक्रमांतर्गत तज्ज्ञांची शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश असोले यांनी दिली.
या अभियानात महिलांच्या वजन, उंची, हिमोग्लोबिन, रक्तातील साखरेचे प्रमाण याबाबतच्या चाचण्या घेण्यात येतील. आवश्यक वाटल्यास रक्ताच्या चाचण्या, छातीचे एक्सरे आणि इतर चाचण्या केल्या जाणार आहेत. कर्करोग, रक्तदाब, मधुमेह याबाबत चाचणी घेतली जाईल. माता आणि बालकांचे लसीकरण केले आहे का याचीही तपासणी केली जाणार आहे. तसेच या अभियानात पोषण, बीएमआय आटोक्यात ठेवण्याबाबत तसेच, मानसिक आरोग्य, स्तनपान, व्यसनमुक्ती याबाबत समुपदेशन केले जाणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कुष्ठरोग अधिकारी डॉ. मनिष शर्मा यांनी तर आभार प्रदर्शन जिल्हा परिषदचे प्रसार माध्यम अधिकारी प्रकाश गवळी यांनी केले.