अकोला,दि.८ जिल्ह्यातील जनावरांमध्ये ‘लम्पि चर्मरोग’ या संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव संदर्भात आज पशुसंवर्धन मंत्री ना. राधाकृष्ण विखे-पाटील यांनी निपाणा व पैलपाडा ता.जि. अकोला येथे भेट देऊन बाधीत जनावरांची पाहणी केली. संसर्गजन्य आजाराचा फैलाव होणार नाही, याकरीता बाधीत क्षेत्रात लसीकरणासह प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने राबवा, असे निर्देश महसूल, दुग्ध व्यवसाय व पशुसंवर्धन मंत्री ना. राधाकृष्ण विखे-पाटील यांनी यावेळी दिले.
निपाणा व पैलपाडा ता. अकोला येथील लम्पि चर्म रोग बाधीत जनावरांची पाहणी दरम्यान ते बोलत होते. यावेळी विधानसभा सदस्य आ. हरिष पिंपळे, आ. प्रकाश भारसाकळे, पशुसंवर्धनआयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, जिल्हाधिकारी निमा अरोरा, मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, जिल्हा पशुसवंर्धन उपआयुक्त डॉ. जगदिश बुकतरे, उपविभागीय अधिकारी डॉ.निलेश अपार, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. गजानन दळवी, सरपंच निपाणा ग्रा. पं. कुमदीनी इंगळे, उपसरपंच कांचन राऊत, पैलपाडा सरपंच वर्षा गऊळ, उपसरपंच गणेश मापारी, पशुधन विकास अधिकारी व ग्रामस्थ आदि उपस्थित होते.
ना. विखे-पाटील यांनी निर्देश दिले की, लम्पि चर्म रोग संबंधित बाधीत गावामध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवावी. याकरीता लसीकरण, पशुपालकापर्यंत औषधी वितरण व गोठे फवारणी तातडीने करुन घ्यावी. सोबतच गोचिड नियत्रंणासाठी आवश्यक त्या उपाययोजना राबवावी. संसर्गाचा फैलाव इतर भागात होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश त्यांनी दिले. त्यानंतर ना. राधाकृष्ण विखे-पाटील यांनी प्रत्यक्ष पशुपालकांसोबत संवाद साधुन पशुसंवर्धन विभागाव्दारे केलेल्या उपायोजनाची माहिती जाणून घेतली. शेतकरी व पशुसंवर्धन विभागाच्या सहकार्याने लम्पि चर्म रोगाला हद्दपार करु, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
जिल्हा पशुसवंर्धन उपआयुक्त डॉ. जगदिश बुकतरे यांनी लम्पि चर्म रोगाच्या अनुषंगाने केलेल्या उपाययोजनाबाबत माहिती दिली.