अकोला, दि.१ :- केंद्र शासनाच्या ‘वन स्टेशन वन शॉप’ या उपक्रमाअंतर्गत अकोला रेल्वे स्टेशन येथे महिला बचत गटांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी स्टॉल आजपासून कार्यान्वित झाला. अकोला रेल्वेस्थानकावरुन ये-जा करणाऱ्या प्रवाशांमार्फत महिला बचतगटांची उत्पादने देशभर जाण्याची संधी निर्माण झाली आहे. जिल्हाधिकारी निमा अरोरा व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार यांच्या हस्ते आज या स्टॉलचे उद्घाटन झाले. आज सकाळी अकोला रेल्वेस्थानकावर हा कार्यक्रम पार पडला.
अकोला रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर हा स्टॉल लावण्यात आला आहे. सुर्योदय महिला बचत गटाला हा स्टॉल मिळाला असून महिला बचतगटाने उत्पादीत केलेली विविध उत्पादने या ठिकाणी विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत. अकोला रेल्वेस्थानकचे मुख्यखंड वाणिज्य निरीक्षक मोहम्मद यामीन अन्सारी, स्टेशन प्रबंधक ए.एस. नांदुरकर, रेल्वे पोलीस बल निरीक्षक युनूस खान, रेल्वे पोलीस स्टेशन प्रभारी अर्चना गाडवे, तसेच निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, सहायक संचालक रोजगार व स्वयंरोजगार तथा कौशल्य विकास द.ल. ठाकरे, शैक्षणिक गुणवत्ता विकास कक्षाचे गजानन महल्ले आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्रीमती अरोरा म्हणाल्या की, ‘प्रवाशांना प्रवासात सोईचा होईल असा अल्पोपहार वा अन्य खाद्यपदार्थ उत्तम पॅकींग करुन उपलब्ध करुन द्यावे. प्रवाशांच्या गरजेप्रमाणे त्यांना ते उपलब्ध होतील व स्टॉलवर होणारी विक्री वाढेल. तसेच अकोला जिल्ह्याचे खास वैशिष्ट्य असणारे उत्पादनेही विक्रीसाठी ठेवावी जेणे करुन अकोला जिल्ह्यातील उत्पादने ही देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचतील. यावेळी सुर्योदय महिला बचत गटाच्या श्रीमती दीपिका देशमुख, सिंधु वानखडे, वैशाली देशमुख, पुनम पिसे आदी महिला सदस्य उपस्थित होत्या. स्टॉलला लगेचच प्रवासी ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला व स्टॉलवरील विविध वस्तू बघण्यासाठी व खरेदीसाठी ग्राहकांमध्ये उत्सूकता दिसून आली.