हिवरखेड- देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून ७५ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल जिल्हा परिषदेच्या एकात्मिक बाल विकास योजने अंर्गत तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड येथे तिरंगा रॅली काढण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महामानवांच्या प्रतिमेचे पूजन करून जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी (म.बा.क.) विलास मरसाळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यानंतर अंगणवाडीतील लहान मुलांनी देशभक्तीपर गीतावर नृत्य केले. अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी सर्वधर्म समभाव चा संदेश देणारी वेशभूषा करून देश रंगीला या गाण्यावर नृत्य करून उपस्थितांचे मन जिंकली. महामानवांच्या वेशभूषेतील लहान मुलांचे अंगणवाडीतील विद्यार्थ्यांचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मरसाळे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या कार्यक्रमानंतर गावातून रॅली काढण्यात आली. रॅलीला उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ध्वज दाखवून सुरुवात करण्यात आली. भारत माता की जय, वंदे मातरम् च्या घोषणांनी गाव दणाणून गेले यावेळी जिल्हा परिषद सदस्या सुलभा दुतोंडे ,उप सरपंच रमेश दुतोंडे बाल विकास प्रकल्प अधिकारी राहुल वरठे विस्तार अधिकारी. मंगेश राऊत, अंगणवाडी पर्यवेक्षिका वैशाली बोदडे, मारोती कडु यांच्या सह गावकरी, अंगणवाडी सेविका, मदतनीस विद्यार्थी यांनी सहभाग नोंदविला होता. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी पर्यवेक्षिका वैशाली बोदडे यांच्या मार्गदर्शनात अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी अथक परिश्रम घेतले.