बहिण- भाऊ ज्या सणाची आतुरतेने वाट पाहात असतात तो रक्षाबंधन सण आता काही दिवसांवर येवून ठेपला आहे. मात्र या वर्षी कॅलेंडरमध्ये या सणाची तिथी आणि तारीख बघताना थोडासा संभ्रम निर्माण होतो. मात्र असे असले तरी रक्षाबंधनाला यावर्षी एक विशेष योग जुळून आला आहे. २४ वर्षांतून एकदा येतो असे ज्यातिष सांगतात. नेमका काय योग आहे, आणि बहिणीने भावाला राखी नेमकी कधी बांधावी हे आपण जाणून घेवूया. (Raksha Bandhan 2022 Muhurat)
11 ऑगस्ट रोजी सकाळी 10 : 39 पासुन श्रावण पौर्णिमा सुरु होते. याच दरम्यान सकाळी 10 : 39 ते रात्री 08 : 51 पर्यंत भद्रा योग आहे. भद्रा काळात शुभ कार्य केले जात नाही. त्यामुळे बंधुराजाला राखी केव्हा बांधावी अशी शंका भगिनींच्या मनात येऊ शकते. याविषयी धर्म अभ्यासक पं. नरेंद्र धारणे सांगतात,
भद्रा ही शनिदेवाची बहीण असा ग्रंथामधे उल्लेख अधिक भिती वाढविणारा आहे. लंकापती रावणाला त्याची बहीण शुर्पणखा हिने भद्रा काळात राखी बांधली आणि वर्ष भरातच रावणाचा अंत झाला, बहीणीचे रक्षण त्याला करता आले नाही. यासंदर्भात अशा अजुनही वेगवेगळ्या कथा आहेत.
अशुभ भद्रा संदर्भात काही अपवाद पाहता वरील दिवशी म्हणजेच 11 ऑगस्टला चंद्र मकर राशीत आहे, पाताळी भद्रा असता फार दोष नाही. दुपारी माध्यान्ही नंतर दोष नसतो. सबब दुपारी 02 : 14 ते दुपारी 03 : 07 ह्या वेळेत रक्षाबंधन अवश्य करावे. हा ‘विजय’ मुहूर्त आहे. ते शक्य न झाल्यास रात्री 08 : 52 ते 09 : 14 ही वेळ घ्यावी.
राखी बांधताना हा मंत्र जरूर म्हणावा…
येन बध्दो बलि राजा दानवेंद्रो महाबलः |
तेन त्वाम मनुबंधामि, रक्षंमाचल माचल ||