अकोला दि.2: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त दि.13 ते 15 ऑगस्ट 2022 दरम्यान ‘हर घर तिरंगा’, हा मोहिम राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने शासनाच्या सर्व यंत्रणानी समन्वय साधून ‘हर घर तिरंगा’ मोहिम यशस्वी करा. याकरीता स्थानिक स्वयंसेवी संस्था, शाळा, महाविद्यालय यांच्या माध्यमातून जनजागृती व विविध उपक्रम युद्धस्तरावर राबवा, असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिले.
‘हर घर तिरंगा’, उपक्रम राबविण्याबाबत आज आढावा बैठक पार पडली. यावेळी मनपाचे उपायुक्त पूनम कळंबे, पातूरचे तहसिलदार दीपक बाजड, बार्शीटाकळीचे तहसिलदार जी.के. हामंद, नायब तहसिलदार एम.आर.पांडे, पोलीस निरीक्षक नितीन शिंदे, शैक्षणिक गुणवत्ता विकास कक्षाचे जिल्हा समन्वयक गजानन महल्ले, प्रकाश गवळी, बाळापूर मुख्याधिकारी शेषराव टाले, उमेद अभियानाचे जिल्हा अभियान व्यवस्थापक नरेंद्र काकड आदी उपस्थित होते.
हर घर तिरंगा मोहिम यशस्वी करण्यासाठी तालुकास्तरावर नियोजन करावे. स्थानिकस्तरावर जनजागृतीसाठी विविध कार्यक्रम राबवावे. यामध्ये चित्ररथ, जिंगल्स, बॅनर्स, सांस्कृतिक कार्यक्रम, रॅली, लोकनाट्य अशा विविध माध्यमांचा वापर करावा,असे शासनाचे निर्देश आहेत. त्याअनुषंगाने सर्व यंत्रणांनी ही मोहिम जिल्हा, तालुका व ग्रामस्तरावर प्रभावीपणे राबवावी, असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिले.
स्वातंत्र्य संग्रामातील नायक, क्रांतिकारक यांचे स्मरण व्हावे तसेच देशभक्तिची जाज्वल्य भावना निर्माण व्हावी याकरीता केंद्र व राज्य शासनाव्दारे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांची माहिती नागरिकांपर्यत पोहोचावी. तसेच प्रत्येक नागरिकांस आपल्या घरावर झेंडा लावण्यासाठी प्रोत्साहित करुन सहभागी होण्याकरीता आवाहन करावे, असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी खडसे यांनी संबधित विभाग प्रमुखांना दिले.