अकोला दि.१५:- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त दि.११ ते १७ ऑगस्ट २०२२ दरम्यान ‘हर घर तिरंगा’, हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमात जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावे,असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे.
‘हर घर तिरंगा’, या उपक्रमाच्या नियोजनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. याबैठकीस जिल्हाधिकारी निमा अरोरा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, अपर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे,उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुरज गोहाड, बाळासाहेब बोटे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले तसेच सर्व नगरपालिका, नगर पंचायत मुख्याधिकारी, विभाग प्रमुख आदी उपस्थित होते.
यासंदर्भात केंद्र शासनाकडून प्राप्त मार्गदर्शक सुचनांची माहिती देण्यात आली. त्यानुसार, दि.११ ते १७ ऑगस्ट या कालावधीत नागरिक, शासकीय- निम शासकीय आस्थापना, शैक्षणिक संस्था इ. ठिकाणी स्वयंस्फूर्तीने राष्ट्रध्वज उभारावयाचा आहे. यात नागरिकांनी स्वेच्छेने सहभागी व्हावे यासाठी जनजागृती करण्यात येणार असून शाळा, महाविद्यालये, राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्रसेना, युवक मंडळे, सेवाभावी संस्था यांचे सहकार्य घेण्यात येणार आहे.
याबाबत सर्व विभागांनी आपापली जबाबदारी पार पाडावी. या उपक्रमासाठी लागणारे राष्ट्रध्वजांची संख्या, त्यांची निर्मिती, विक्री व वितरण यासाठीचे नियोजन करुन राष्ट्रध्वज लावण्यात येणाऱ्या घरांची संख्या निश्चित करणे ही कामे कालबद्ध पद्धतीने करावयाची आहेत. या उपक्रमात जास्तीत जास्त नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावे,असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी यावेळी केले.
सोमवारी(दि.१८)स्वंयसेवी संस्थाची बैठक
हर घर तिरंगा अभियान राबविण्यात योगदान देवू इच्छणाऱ्या शहरातील स्वयंसेवी व सामाजिक संस्थांची बैठक सोमवार दि. १८ रोजी दुपारी चार वाजता नियोजन सभागृहात होणार आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी कळविले आहे.