अकोला, दि.१३ :- ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी निर्माण करुन महिलांना आर्थिक सक्षम बनविण्यात बचतगटांच्या चळवळीचे योगदान आहे. अशा बचतगटांना कर्जरुपी अर्थसहाय्य हे बॅंकांमार्फत दिले जाते. त्यासाठी बचतगटाच्या महिला कार्यकर्त्या, उमेदची टिम, बॅंका व स्थानिक प्रशासन यांच्या संघटीत प्रयत्नातून ग्रामीण भागात परिवर्तन होईल, असा विश्वास जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी व्यक्त केला.
महिला बचतगटांना अर्थसहाय्य देण्यात अकोला जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर असून गत आर्थिक वर्षात ७२ कोटी रुपयांचे अर्थसहाय्य वितरीत झाले आहे, अशी माहितीही जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या वतीने यावेळी देण्यात आली.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, उमेद यांच्यावतीने महिला बचतगटांना अर्थसहाय्य या संदर्भात बॅंकांच्या अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण आज पार पडले. हॉटेल जसनागरा येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात महिला बचत गटांना अर्थसहाय्य प्रदान करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करणाऱ्या बॅंक कर्मचारी व अधिकाऱ्यांना सन्मानीत करण्यात आले. या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सुरज गोहाड, जिल्हा अग्रणी बॅंकेचे व्यवस्थापक नयन सिन्हा तसेच विविध बॅंकांचे क्षेत्रिय व्यवस्थापक, अधिकारी, बॅंक सखी आदी उपस्थित होते.
प्रास्ताविकात सुरज गोहाड यांनी सांगितले की, महिला बचत गटांना बॅंकांमार्फत अर्थसहाय्य देण्यात अकोला जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. आतापर्यंत ७२ कोटी रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात आले आहे. विशेष म्हणजे महिला बचतगटांची कर्जपरतफेड ही नियमित असून थकबाकीचे प्रमाण नगण्य आहे. येत्या काळात अधिक बचतगटांना अर्थसहाय्य देऊन राज्यात प्रथम क्रमांक मिळविण्यासाठी प्रयत्न होतील,असे त्यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार म्हणाले की, बॅंकांचा महिला बचतगटांना मिळणारा प्रतिसाद हा या उपलब्धतेमागील महत्त्वाचा घटक आहे. बॅंकांच्या या पाठींब्यामुळे ग्रामीण भागात महिला सक्षमीकरणाला बळ मिळत असून खरेखुरे सामाजिक परिवर्तन होईल.
जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी, अद्यापही अधिक चांगले काम करुन अधिकाधिक महिलांना रोजगार उपलब्ध करुन देण्यास वाव आहे. त्यादृष्टीने सर्व बॅंका व संबंधित घटकांनी कार्य करावे. महिला बचतगटांकडून होणारी कर्ज परतफेड हा सुद्धा महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे बॅंकांनी त्यांना अर्थसहाय्य करावे. येत्या काळात राज्यात अकोला जिल्हा प्रथम क्रमांकावर आणण्यासाठीही सगळ्यांनी प्रयत्न करावे,असे आवाहन त्यांनी केले. डॉ. सुभाष पवार यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमात सेंट्रल बॅंकेचे राजेश मिश्रा, विदर्भ कोकण ग्रामीण बॅंकेचे बन्नोरे, स्टेट बॅंक ऑफ इंडीयाच्या श्रीमती जोशी, बॅंक ऑफ महाराष्ट्रचे परात अशा विविध बॅंकांच्या क्षेत्रीय तसेच स्थानिक अधिकाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी संतोष इंगोले, चंद्रकांत खंडारे, उमेदचे गजानन महल्ले आदींनी परिश्रम घेतले.