जेजुरी : महाराष्ट्राचे कुलदैवत व बहुजन समाजाचा लोकदेव असणार्या जेजुरीच्या खंडोबादेवाची सोमवती यात्रा अडीच वर्षांच्या कोरोनाच्या संकटानंतर सोमवारी (दि. 30) भरणार आहे. सोमवती यात्रेच्या नियोजनासाठी मंगळावारी (दि. 24) ऐतिहासिक मल्हार गौतमेश्वर (छत्री मंदिर) मंदिर आवारात ग्रामस्थांची बैठक झाली. सोमवारी (दि. 30) अमावास्या सायंकाळी 4 वाजून 59 मिनिटांपर्यंत असल्याने सकाळी 11 वाजता जेजुरीगडावरून श्री खंडोबादेवाचा पालखी सोहळा निघणार आहे.
दुपारी चार वाजण्याच्या दरम्यान कर्हा नदीवरील पापनाशक तीर्थावर कर्हास्नान होईल, असे या वेळी खंडोबा देवाचे मानकरी राजेंद्र पेशवे इनामदार यांनी सांगितले. या सोहळ्यासाठी श्री मार्तंड देवसंस्थानच्या वतीने पालखी सोहळ्याच्या मार्गावर रस्त्यांची साफसफाई, पिण्याचे पाणी, नाष्टा, खांदेकरी व मानकरी यांना सॉक्स, टोपी तसेच मंडपव्यवस्था करण्यात आल्याचे देवसंस्थानचे विश्वस्त पंकज निकुडे पाटील यांनी सांगितले.