मुंबई : कापूस दरवाढ राज्यातील सूत गिरण्या आणि यंत्रमाग उद्योगासाठी धोक्याची घंटा ठरत आहे. दरवाढ सुरु राहिली तर सर्व सूत गिरण्या व यंत्रमाग कारखाने कोणत्याही क्षणी बंद पडण्याची शक्यता आहे.
दरम्यान, कापसाच्या अपुर्या पुरवठ्यामुळे दक्षिण भारतातील दि साऊथ इंडिया स्पिनर्स असोसिएशन कोईमतूर यांनी कापसाचे नवीन उत्पादन येईपर्यंत सूत गिरण्या बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याच धर्तीवर महाराष्ट्रातील सहकारी व खाजगी सूत गिरण्या बंद करण्याचा निर्णय जाहीर करावा अशी मागणी अनेक सूत गिरण्या चालकांनी महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी यांच्याकडे केली आहे.
यासंदर्भात लवकरच महाराष्ट्रातील सूत गिरण्यांचे संचालक वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख, राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री पियुष गोयल यांची भेट घेणार आहे. त्यानंतरच सूत गिरण्या बंद ठेवण्याबाबतचा अंतिम निर्णय घेणार असल्याचे, अशोक स्वामी यांनी सांगितले.