अकोला– जिल्ह्याचे पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी निर्देश दिल्यानुसार जिल्ह्यात 11 एप्रिल ते 15 मे तसेच त्याआधी 25 फेब्रुवारी ते 31 मार्च या कालावधीत रेशनकार्ड तक्रारमुक्त गाव व रेशनकार्ड संदर्भात तक्रारींचा निपटारा करण्याचे विशेष अभियान राबविण्यात आले होते. या अभियानांमध्ये अनुक्रमे 13072 व 14599 असे एकूण 27 हजार 671 तक्रारींचा निपटारा करण्यात आला आहे.
जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी नागरिकांना शिधापत्रिका मिळणे व त्यासंदर्भातील अन्य कामे जसे नावे वगळणे, नावे समाविष्ट करणे, शिधापत्रिका विभाजन करणे इ. हे सहजरित्या व्हावे यासाठी रेशनकार्ड तक्रारमुक्त गाव हे अभियान राबविण्याबाबत प्रशासनाला निर्देश दिले होते.
जिल्ह्यात एकूण शिधापत्रिकांची संख्या 3 लाख 25 हजार 115 इतकी आहे. कुटुंबातील नावे कमी होणे, नविन सदस्य कुटुंबात येणे, कुटुंबांचे विभाजन होऊन नव्या शिधापत्रिकेची आवश्यकता भासणे, स्थलांतरामुळे नव्या ठिकाणी शिधापत्रिका स्वस्त धान्य दुकानाला जोडणे अशा प्रकारची कामे प्रशासनाकडे जाऊन करावी लागतात. त्याबाबत या कामांचा निपटारा करण्यासाठी पालकमंत्र्यांच्या संकल्पनेतून विशेष अभियान राबविण्यात आली. जिल्ह्यात एकाच वेळी रेशनकार्ड तक्रारींचा निपटारा करण्यासाठी विशेष अभियान राबविण्याचे निर्देश दिले होते. या अभियानांमध्ये दिव्यांग व्यक्ती, अनाथ व्यक्ती, दुर्धर आजाराने ग्रस्त व्यक्ती अशांना प्राधान्याने शिधापत्रिका देऊन लाभ देण्यात आला.
त्यानुसार जिल्हा प्रशासनाने दि.25 फेब्रुवारी ते 31 मार्च या कालावधीत रेशनकार्ड संदर्भातील तक्रारींचा निपटारा करण्यासाठी विशेष अभियान राबविले होते. या मोहिमेत 2180 नवीन शिधापत्रिका देण्यात आल्या. 6633 दुय्यम शिधापत्रिका देण्यात आल्या. 2954 प्रकरणी शिधापत्रिकेत नावे समाविष्ट करण्यात आले. 2500 प्रकरणात शिधापत्रिकेतील नावे कमी करण्यात आली. तब्बल 14599 कार्डधारकांच्या तक्रारींचा निपटारा या अभियानात करण्यात आला.
तसेच दि.11 एप्रिल ते 15 मे या कालावधीत राबविण्यात आलेल्या रेशनकार्ड तक्रारमुक्त गाव या अभियानात जिल्ह्यातील 883 गावांपैकी 686 गावांमधून तक्रारी अर्ज प्राप्त झाले. त्यात 8616 जणांना दुय्यम शिधापत्रिका देण्यात आली. 2370 प्रकरणांत शिधापत्रिकेतील नावे समाविष्ट करण्यात आली. 2086 प्रकरणात शिधापत्रिकेतील नावे वगळण्यात आली. अशी एकूण 13072 प्रकरणांवर कारवाई पूर्ण झाली. एकूण दोन्ही अभियानात मिळून 27,671 प्रकरणांचा निपटारा या दोन्ही अभियानात करण्यात आला, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी बी.यु. काळे यांनी दिली.