अकोला,दि.16 रोजगार नोंदणी पंधरवाडा (दि.14 एप्रिल ते 1 मे) राबविण्यात आला. त्यात 57 हजारांहून अधिक जणांनी नोंदणी केली आहे. या माहितीचे योग्य पद्धतीने पृथ्थकरण करुन माहितीची सारणी सादर करा, जेणे करुन त्या माहितीच्या आधारे इच्छुकांच्या मागणीनुसार त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन देता येईल, असे निर्देश राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी आज येथे दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात यासंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस जिल्हाधिकारी निमा अरोरा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा कौशल्य विकास अधिकारी डी. एल. ठाकरे, सर्व गटविकास अधिकारी आदी उपस्थित होते.
जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या रोजगार नोंदणी पंधरवाड्यात ज्या ज्या युवक युवतींनी रोजगार नोंदणी केली. त्या सर्व नोंदणीची माहिती एकत्र संकलित करावी. या माहितीत युवक युवतींचे आवश्यक शिक्षण, कौशल्य व त्यांनी नोंदविलेली रोजगाराची पसंती या आधारे जिल्ह्यात रोजगार मेळावे आयोजित करुन त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन दिली जाईल. त्यासाठी प्राप्त माहितीचे योग्य पृथ्थकरण करुन माहिती सादर करावी, असे निर्देश पालकमंत्री कडू यांनी यंत्रणेस दिले.