अकोला दि.2: लहान बालकांमध्ये प्राण्याविषयी आपुलकी निर्माण करण्यासाठी बाल अवस्थेपासूनच त्यांच्यावर संस्कार होणे आवश्यक आहे. याकरीता सर्वांनी प्रयत्न करणे गरजेच आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी जागतिक पुशुवैद्यक दिनानिमित्त आयोजीत कार्यक्रमात केले.
पशुसंवर्धन विभाग व प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पशुवैद्यक दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुभाष पवार, जिल्हा परिषदचे पशुसंवर्धन समितीचे सभापती पंजाबराव वडाळ, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. जगदीश बुकतारे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, पुशुवैद्यकीय अधिकारी डॉ.तुषार बावने, प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीचे सदस्य राखी वर्मा, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलींद दुसाने, प्राणी प्रेमी संस्थांचे कार्यकर्ते, नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी निमा अरोरा म्हणाल्या की, प्रशासनासोबत खाजगी संस्थानी प्राण्याच्या संरक्षणाकरीता पुढाकार घ्यावा. जिल्ह्यातील प्राणी क्लेश प्रतिबंधक समिती, स्वयसेवी संस्था व प्राणीप्रेमी यांचे योगदान मोलाचे असून पशुपक्षांच्या मदतीकरीता सर्वांनी पुढाकार घ्यावा. पशुवैद्यकीय विभागाव्दारे आयोजीत कार्यक्रम व प्राण्याकरीता राबवित असलेले उपक्रम कौतुकास्पद आहे. तसेच पशुच्या आरोग्य सोईसुविधांकरीता आवश्यक साहित्य, एक्सरे याबाबतचा प्रस्ताव सादर करावा. पशुसंवर्धनाकरीता सर्वातोपरी मदत करण्याचे जिल्हाधिकारी यांनी आश्वस्त केले. इनकरेज इव्हिनिंग स्कूलच्या विद्यार्थ्यांव्दारे प्राणीप्रेम विषयी सादर केलेले नृत्यनाटीकेचे जिल्हाधिकाऱ्यांनी कौतुक केले.
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार म्हणाले की, पशु पक्षी यांच्या आरोग्याविषयी माहिती घेवून त्यांच्यावर उपचार करावा लागतो. काही प्रसंगी प्राण्याच्या व्यवहारातून त्यांच्यावर उपचार पद्धती राबवावी लागते. पशुवैद्यकीय अधिकारी निस्वार्थपणे प्राण्याची सेवा करतात. त्यांच्या कामाचे कौतुक करावे ते कमीच आहे. पशु वैद्यकीय विभागाने पशुच्या आरोग्य संवर्धनासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे. पशुच्या आरोग्यविषयी जनजागृती करावी. यामाध्यमातून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होवून त्यांना लाभ मिळेल.
निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे म्हणाले की, केवळ माणसाने माणसावर प्रेम न करता पशुवरही प्रेम करावे. सदृढ प्राण्यांसोबत असहाय्य प्राण्यांचेही पालनपोषण करावे. अशा प्राण्यांकरीता कार्य करणाऱ्या संस्थेचे कार्य अभिमानाची बाब आहे.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्राण्याविषयी जनजागृती व्हावी याकरीता नाट्यगीत, एकपात्री नाटक, नृत्यनाटीका व कार्यक्रम सादर केले. तसेच श्वान दत्तक अभियानाअंतर्गत जिल्हाधिकारी यांच्या हस्ते प्राणीप्रेमींकडे भटके श्वान दत्तक देण्यात आले. तर पशुसंवर्धनाचे उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी कर्मचारी व स्वयंसेवी संस्थाना पुरस्कार वितरण करण्यात आले. त्यात प्रवीण राठोड, जीवन अपोतीकर, रघुनाथ इंगळे, किशोर पुंडकर, डॉ. मंगेश दांदळे, संजय उपाध्ये, डॉ. दिलीप श्रीराम बिप्लेवार, डॉ. राजेश भानुदास सोनाने, डॉ. सुनिल अढाऊ, डॉ. रणजित गोळे, चंद्रशेखर देशमुख, सैय्यद मुकसूद सै. अब्दुल सत्तार, डॉ. तुषार बावने यांना प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. जगदीश बुकतारे यांनी तर सुत्र संचालन गुंजन इंगळे व डॉ. तुषार बावने यांनी केले.