अकोला,दि.७: जिल्ह्याचे खास वैशिष्ट्य जपणाऱ्या केळीवेळी गावातील राज्यस्तरीय कबड्डी सामने नेहमीच क्रीडा रसिकांच्या कौतुकाचा आणि उत्सुकतेचा विषय असतात. यास्पर्धेचा रविवारी (दि.६) समारोप झाला. या समारोपीय सामन्यांना राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी स्वतः हजेरी लावली. इतकेच नव्हे तर आपल्यातला कबड्डीपटू जागवत स्वतः मैदानात एन्ट्री घेतली, एक खेळाडू टिपून बादही केला, आणि आपल्यातल्या खिलाडुवृत्तीचे दर्शन घडविले.
केळीवेळी येथे शुक्रवार दि. ४ पासून राज्यस्तरीय सामने आयोजित करण्यात आले आहेत. या स्पर्धेत राज्यभरातून ४० संघांनी सहभाग नोंदविला. त्यात २८ पुरुष संघ तर १२ महिला संघाचा समावेश होता. रविवारी या स्पर्धांचा समारोप झाला. या स्पर्धेत महिला गटातून अंतिम सामना साई स्पोर्ट, विदर्भ व समर्थ क्रीडा मंडळ, काटोल या संघामध्ये तर पुरुष गटातून अंतिम सामना समर्थ क्रीडा मंडळ, अमरावती व सी.टी.पी.एस. चंद्रपूर या दोन संघामध्ये झाला. त्यात महिला गटात साई स्पोर्ट, विदर्भ तर पुरुषांमध्ये समर्थ क्रीडा मंडळ, अमरावती या संघांनी आपले अजिंक्यपद पटकावले. विजेता महिला व पुरुष संघाना ७१ हजार रुपये प्रत्येकी तर उपविजेत्या संघांना ५१ हजार रुपये पारितोषिक देण्यात आले. यावेळी पालकमंत्री बच्चू कडू यांची उपस्थिती होती. पालकमंत्री कडू यांनी आपल्या भाषणात केळीवेळी ग्रामस्थांनी इतक्या सुंदर स्पर्धा आयोजित केल्याबद्दल कौतुक केले तसेच या स्पर्धांमुळे केळीवेळीचा लौकिक राज्यभर झाला, असे गौरवोद्गार काढले.
यासमारंभास विधानपरिषदचे सदस्य आ. डॉ. रणजीत पाटील, ग्राममंडळाचे अध्यक्ष किशोर बुले, माजी आमदार गजानन दाळू गुरुजी, उपविभागीय अधिकारी श्रीकांत देशपांडे, उपवनसंरक्षक के.के. अर्जुना, नायब तहसिलदार हरिश गुरवे, केळीवेळी हनुमान मंडळाचे अध्यक्ष माधवराव बकाल, उपाध्यक्ष प्रशांत आढे उपस्थित होते. या स्पर्धेसाठी क्रीडारसिकांनी मोठी गर्दी केली होती. विजेत्या संघास मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.