अकोला, दि. 2: कोविड महामारीमुळे पालक गमावलेल्या बालकांचा बाल संगोपन योजनेत प्राधान्याने समावेश करा. मिशन वात्सल्य योजनेअंतर्गत कोविडमुळे पतीचे निधन होऊन विधवा झालेल्या महिलांना शासनाच्या सर्व योजनांचा लाभ मिळवून द्यावा. त्यासाठी बाल विकास प्रकल्प अधिकारी, तहसिलदार व मुख्याधिकारी यांनी तालुकास्तरावर नियमित बैठका घेवून आढावा घ्यावा,असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आज दिले.
कोवीड -19 महामारीमुळे पालक गमावलेल्या बालक व पती गमावल्याने विधवा झालेल्या महिलांच्या मदत व पुनर्वसनाबाबत जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आज आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवानात ही बैठक पार पडली. यावेळी महिला व बालविकास अधिकारी विलास मरसाळे, बाल कल्याण समितीच्या अध्यक्ष सौ. पल्लवी कुळकर्णी, चाईल्ड लाईन समन्वयक हर्षाली गजभिये, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी राजु लाडुलकर, सुनिल सरकटे, बाल विकास प्रकल्प अधिकारी आर.जी. वरठे, ए.बी. रायबोले, बाल कल्याण समितीचे सदस्य आदी उपस्थित होते.
जिल्ह्यात कोरोना झाल्यामुळे ज्या बालकांनी आपले पालक गमावले त्या बालकांचा शोध घेण्याकरीता जिल्हास्तरीय कृती दल गठीत करण्यात आले आहे. या कृती दल समितीमार्फत पालक गमावलेल्या बालकांचे पालनपोषण व संरक्षण करण्यात येते. सध्या जिल्ह्यामध्ये कोविडमुळे पालक गमावलेले पाच बालकांचा शोध घेण्यात आला आहे. त्यापैकी तीन बालकांना मुदत ठेव व प्रमाणपत्र देण्यात आले असून उर्वरित दोन अनाथ बालकांचे पोस्ट ऑफिसमध्ये संयुक्त खाते काढून देण्यात आले आहे व तशी माहिती पोर्टलवर देण्यात आली आहे. कोविडमध्ये एकल पालक गमावलेले 18 वर्षाखालील एकूण 194 बालके असून त्यापैकी 154 बालकांना बालसंगोपन योजनेचा लाभ देण्यात आला आहे. उर्वरित बालकांना लाभ देण्याची कार्यवाही सुरु आहे, अशी माहिती महिला व बालविकास अधिकारी विलास मरसाळे यांनी दिली.
कोविड महामारीमुळे पालक गमावलेल्या बालकांना बाल संगोपन योजनेत प्राधान्याने समावेश करा. तसेच मिशन वात्सल्य योजनेचा कोविडमुळे पती गमावल्याने विधवा झालेल्या महिलांना शासनाच्या सर्व योजनांचा लाभ मिळवून द्यावा. याकरीता बाल विकास प्रकल्प अधिकारी, तहसिलदार व मुख्याधिकारी यांनी तालुकास्तरावर नियमित बैठका घेवून आढावा घ्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिले.