अकोला,दि.2 : माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता १० वी) व उच्च माध्यमिक प्रमाण पत्र परीक्षा (इयत्ता १२ वी) दि.४ मार्च ते ४ एप्रिल या कालावधीत जिल्ह्यात विविध परीक्षा केंद्रांवर होणार आहेत. या परीक्षा शांततेच्या वातावरणात पार पडाव्या तसेच परीक्षा केंद्र परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी जारी केले आहेत.
या आदेशात म्हटल्यानुसार, दि.४ मार्च ते ४ एप्रिल या कालावधीत जिल्ह्यातील परीक्षा केंद्र व त्या बाहेरील १०० मिटर परिसरात सकाळी आठ ते सायंकाळी सहा या कालावधीत प्रतिबंधात्मक आदेश लागू असतील. त्यानुसार, परीक्षा केंद्र परिसरात एकाच वेळी पाच पेक्षा अधिक व्यक्ती एका वेळी प्रवेश करणार नाहीत. परीक्षा केंद्रावर प्रवेश करणाऱ्या परीक्षार्थी, अधिकारी, कर्मचारी यांची थर्मल इन्फ्रारेड थर्मामिटरद्वारे तपासणी करावी. पर्यवेक्षकांची रॅपिड ॲन्टिजेन चाचणी करणे अनिवार्य आहे. परीक्षा केंद्रावरील सर्व खिडक्या व दरवाजे उघडे ठेवुन हवा खेळती ठेवावी. मास्कचा वापर अनिवार्य आहे. प्रत्येक परीक्षार्थी मध्ये तीन फुटाचे अंतर राहील अशी बैठक व्यवस्था असावी. परीक्षा केंद्राच्या प्रवेशद्वारासमोर सॅनिटायझरची व्यवस्था करावी. परीक्षा केंद्राची व परिसराची सोडियम हायपोक्लोराईटच्या सहाय्याने निर्जंतूकीकरण करावे. कोणत्याही परीक्षार्थी / अधिकारी / कर्मचारी यांना कोविडची लक्षणे दिसल्यास तात्काळ नजिकच्या रुग्णालयात भरती करावे. शांतता भंग होईल असे कोणतेही कृत्य करण्यास मनाई आहे. परीक्षा केंद्राच्या १०० मिटर परिसरात झेरॉक्स सेंटर, फॅक्स मशीन, पान पट्टी, लॅपटॉप, टायपिंग सेंटर, एसटीडी बुथ, ध्वनीक्षेपक इ. माध्यमे परीक्षा संपेपर्यंत बंद ठेवण्यात येतील. परीक्षा केंद्र परिसरात इंटरनेट, मोबाईल फोन, सेल्युलर फोन, इ.मेल इ. प्रसार माध्यमे घेऊन प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. कोणत्याही अनधिकृत व्यक्ती व वाहनास प्रवेश मनाई राहील. या प्रतिबंधात्मक आदेशातून परीक्षा केंद्रावर नियुक्त अधिकारी, कर्मचारी, परीक्षार्थी तसेच देखरेख करणारे अधिकृत अधिकारी- कर्मचारी, पोलीस अधिकारी यांना कर्तव्य पार पाडण्याच्या दृष्टीने लागू राहणार नाहीत, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.