अकोला,दि.26 : जिल्ह्यात कार्यरत मायक्रोफायनान्स कंपन्यांनी ग्रामीण भागात पतपुरवठा वाढवावा, त्याद्वारे रोजगार निर्मितीस चालना द्यावी,असे निर्देश राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी आज मूर्तिजापूर येथे दिले.
जिल्ह्यात मायक्रोफायनान्स कंपन्यांसंदर्भात प्राप्त तक्रारींचा निपटारा करण्यासाठी आढावा घेण्यात आला. या बैठकीस जिल्हाधिकारी निमा अरोरा, उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते पाटील,तहसीलदार प्रदीप पवार, जिल्हा उपनिबंधक विनायक कहाळेकर,जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक आलोक तेरानिया तसेच सर्व मायक्रोफायनान्स कंपन्यांचे क्षेत्रीय अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यात ग्रामीण भागात छोटे व्यवसाय करणारे, शेतीपूरक व्यवसाय करणारे ,महिला, महिला बचतगट अशा घटकांना अर्थसहाय्य मायक्रोफायनान्स कंपन्यांनी करावे. हा पतपुरवठा वाढवून रोजगार निर्मितीला चालना द्यावी, असे निर्देश पालकमंत्री कडू यांनी यावेळी दिले. या पतपुरवठ्याद्वारे शेळीपालन, कुक्कुटपालन, घरगुती उद्योग, लहान व्यावसायिक अशा घटकांना प्रगतीसाठी चालना मिळेल. याबाबत कालबद्ध कार्यक्रम राबविण्यासाठी अकोला जिल्ह्यातील पतपुरवठ्यासाठी एक आराखडा तयार करावा,अशीही सूचना त्यांनी केली.
पालकमंत्र्यांच्या हस्ते वृक्षारोपण
येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या आवारात पालकमंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते पाटील, तहसिलदार प्रदीप पवार व अन्य अधिकारी उपस्थित होते.