अकोला: विदर्भातील कब्बडीची पंढरी समजल्या जाणाऱ्या केळीवेळी येथे ४, ५ व ६ मार्च रोजी आंतरराष्ट्रीय कबड्डी खेळाडू विनायक माळी चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती हनुमान मंडळाचे संयोजक माजी आमदार गजाननराव दाळू गुरुजी यांनी अकोला येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
कोरोना महामारीमुळे ह्या स्पर्धेला मुहूर्त मिळत नव्हता मात्र बहुप्रत्क्षित असलेल्या विनायक माळी चषक स्पर्धा आता होणार असल्याने कबड्डी खेळाडू व कबड्डी खेळावर प्रेम करणाऱ्या सर्वांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या स्पर्धेत पुरुष व महिला संघ सहभागी होणार असून त्यांच्यासाठी बक्षीसांची लयलूट करण्यात आली असल्याचे दाळू गुरुजी म्हणाले, पुरुष विभागात प्रथम बक्षीस भाई दे. मा. कराळे स्मृती प्रित्यर्थ कराळे ज्वेलर्स अकोला यांच्याकडून एकाहत्तर हजार रुपयांचे असणार आहे. द्वितीय बक्षीस वस्ताद स्व. गिरधरराव रामाजी कोडापे बाखडी बलारपूर यांच्या स्मृती प्रित्यर्थ एकाव्वन हजार रुपये असे राहणार आहे. तर तृतीय यक्षीस अकोला जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती आकाश सिरसाट यांचेकडून एकतीस हजार रुपये दिल्या जाणार असून त्यामध्ये मॅन ऑफ द सिरीज स्व. दादासाहेब खोटरे स्मृती प्रित्यर्थ अकरा हजार रोख तर बेस्ट रेडर म्हणून अजय हनवंते यांचे कडून पाच हजार रुपये रोख बक्षीस देण्यात येईल. बेस्ट कॅचीअर म्हणून नागपूरचे विजयराव मोडक यांचे वतीने पाच हजाराचे बक्षीस राहणार आहे. मॅन ऑफ द डे म्हणून दररोज अमरावतीचे राहुल शेळके, चंदुभाऊ गाडे व नागपूरचे बाळुभाऊ चव्हाण यांच्या वतीने सायकल सप्रेम भेट दिल्या जाणार आहे. पुरुष संघात ऑल राऊंडर खेळाडूस सुद्धा उगव्याचे श्रीकांत वाघ यांचे वतीने सायकल बक्षीस म्हणून दिली जाणार आहे. या शिवाय प्रत्येक संघातील उत्कृष्ट खेळाडूस प्रोत्साहनपर स्पोर्टस कीट, ट्रॅक सुट, स्पोर्टस् शु आदी भेट वस्तु दिल्या जाणार आहेत.
महिला संघातील देखील पुरुष संघाप्रमाणेच बक्षीसांची लयलुट राहणार असून एस. एस. खरोटे ज्वेलर्स अकोला यांचेकडून एकाहत्तर हज़ार रुपयांचे प्रथम बक्षीस राहणार असून द्वितीय बक्षीस एकाव्यन हजार रुपये स्व. अमृतराव जगताप यांच्या स्मृती स्व. श्री मोहन दोरे प्रित्यर्थ दिले जाणार आहे. राष्ट्रवादीचे नेते रामप्रभु तराळे यांचे वतीने एकतीस हजार रुपये रोख रुपयांचे तृतीय बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. या व्यतिरिक्त लेडी ऑफ द सिरीज अकरा हजार रुपयांचे बक्षीस स्व. सुनिलभाऊ शिवरकार यांचे स्मृती प्रित्यर्थ दिले जाणार असून बेस्ट रेडरसाठी पाच हजार रुपये रोख बक्षीस सुरेंद्र खोडे कांडली परतवाडा यांचे वतीने देण्यात येईल. पुरुष संघाप्रमाणेच महिला संघाच्या मॅन ऑफ द डे खेळाडूला सायकल मिळणार असून यासाठी वाशिमचे प्रदीप बोडखे, बुलडाण्याचे अमरदिप ठाकुर व पातुर्डा येथील रफीक शहा यांनी ही सायकल प्रायोजित केली आहे. मूर्तिजापूरचे जावेद खान यांच्या वतीने महिला संघातील ऑल राऊंडर खेळाडूस सुद्धा सायकल दिला असून उत्कृष्ट खेळाडूस प्रोत्साहनपर विविध बक्षीसे देण्यात येणार असल्याची
माहिती दाळू गुरुजी यांनी दिली आहे. स्पर्धेसाठी पालकमंत्री बचुभाऊ कडू यांचेसह विविध खात्याच्या मंत्र्यांना निमंत्रीत करण्यात आले असून सिने कलावंतही उपस्थित राहणर असल्याचे दाळू गुरुजी म्हणाले. दि. ५ मार्च रोजी विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे माजी अध्यक्ष प्रा. तुकारामभाऊ बिडकर यांचा वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे. अशी माहिती सुद्धा दाळू गुरुजी यांनी पत्रकार परिषदेच्या शेवटी दिली आहे.
या पत्रकार परिषदेला मंडळाचे अध्यक्ष माधवराव बकाल, गजेंद्रसिंह ठाकुर, डॉ. राजकुमार बुले, गणेश पोटे, दिलीप आसरे, संजय चौधरी, धनंजय मिश्रा व आंतरराष्ट्रीय खेळाडू विनायकू माळी उपस्थित होते. संतोष शिवरकार, श्री ज्ञानदेवराव परनाटे, ग्राम मंडळाचे अध्यक्ष किशोर बुले ,ग्राम मंडळाचे उपाध्यक्ष भगवान आढे,कैलास सिंह ठाकुर, श्रीकृष्ण आढे, प्रमोद सुरे उपस्थित होते.