अकोला, दि.22 स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शनिवार दि.१९ रोजी जिल्ह्याभरात शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध विद्यालयात किल्ले बनवा स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी इतिहासाचे धडे गिरविले. या स्पर्धेत समृद्धी गावंडे, मजलापूर हिने प्रथम, द्वितीय राधिका गणेश चोपडे, निपाणा, तृतीय कार्तीक वाघमारे अकोला या विद्यार्थ्यांनी उत्तम किल्ले बनवून पारितोषिक पटकावले. या सर्व विद्यार्थ्यांना जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या प्रमुख उपस्थितीत पारितोषिक प्रदान करण्यात आले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्यासह जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, जिल्हा शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता पाटेकर, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने, समर्थ पब्लिक स्कूलचे अध्यक्ष नितीन बाठे, मुख्याध्यापक अनिता श्रीवास्तव, शैक्षणिक गुणवत्ता कक्षाचे गजानन महल्ले आदी उपस्थित होते.
स्पर्धेचा निकाल परीक्षकांच्या वतीने आशिष चौथे यांनी जाहीर केला. जाहीर झालेला निकाल याप्रमाणे-
प्रथमः समृद्धी विजय गावंडे, यशवंतराव चव्हाण विद्यालय, मजलापूर, द्वितीयः राधिका गणेश चोपडे, जय भवानी विद्यालय, निपाणा, तृतीयः कार्तीक वाघमारे, समर्थ पब्लिक स्कूल, अकोला, उत्तेजनार्थ पारितोषिके याप्रमाणे- सायली भाऊसाहेब पाचपोर, स्वामी विवेकानंद हायस्कूल, हाता, अथर्व अनवाणे, भारत विद्यालय, अकोला, हर्षा प्रविण राऊत, हनुमान प्रसाद विद्यालय, दानापूर, शंतनू नंदकिशोर राऊत, जयभवानी विद्यालय, निपाणा, योगेश विठ्ठल कुराळे, जि.प. शाळा खापरखेड.
प्रास्ताविकातून गजानन महल्ले यांनी माहिती दिली की, या स्पर्धेत जिल्ह्यातील ४३ विद्यालयातील विद्यार्थ्यांनी ७५ किल्ले साकारुन सहभाग घेतला. मुख्याध्यापक अनिता श्रीवास्तव यांनी स्पर्धेच्या आयोजनाची माहिती दिली. स्पर्धेतील प्रमुख किल्ले प्रतिकृतींचे सादरीकरण करण्यात आले.
जिल्हा शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता पाटकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना सांगितले की, या स्पर्धेतून विद्यार्थ्यांना इतिहासासोबतच अन्य शालेय अभ्यासक्रमातील विषयांचे धडे गिरवले. विद्यार्थ्यांनी अशा स्पर्धांमध्ये भाग घेऊन आपले कौशल्य विकसीत करावे,असे त्यांनी सांगितले. निवासी उपजिल्हाधिकारी खडसे यांनी या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजनातील सर्व घटकांचे कौतूक केले. जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी सर्व विद्यार्थ्यांचे स्पर्धेतील सहभागा बद्दल अभिनंदन व कौतुक केले. समर्थ पब्लिक स्कूलचे अध्यक्ष नितीन बाठे यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.
या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून आशिष चौथे, प्रमोद गिते, राजेश्वर बुंदेले, प्रमोद देहानकर, योगेश शेलकर, नितीन गवारे, संदीप शेवलकार, जितेंद्र डहाके, चंद्रकांत वाघ, विवेक फोकमारे, योगेश मल्लेकर,मधुकर पुरी यांनी काम पाहिले.
सूत्रसंचालन जया भारती यांनी केले तर प्रास्ताविक व आभार प्रदर्शन गजानन महल्ले यांनी केले. या कार्यक्रमाला शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक आदी उपस्थित होते.