नाशिक : मंगेशकर कुटुंबीय नाशिक मधील रामकुंडावर दाखल झाले आहे. लता दिदींच्या अस्थी रामकुंड येथे विसर्जनासाठी आणण्यात आल्या आहेत. थोड्या वेळातच गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या अस्थींचे विसर्जन येथे करण्यात येत आहे. या अस्थींचे विधीवत पूजन सुरु आहे.
यासाठी आशा भोसले, उषा मंंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर, मिलिंद नार्वेकर आदी मान्यवर रामकुंडावर उपस्थित आहेत. लता मंगेशकर यांचे दि. ६ फेब्रुवारी रोजी निधन झाले. दादरच्या शिवाजी पार्कवर त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठा जनसागर लोटला होता. ज्यांना अंत्ययात्रेत सहभागी होता आले नाही, त्यांना अस्थिकलशाचे दर्शन घेता येणार आहे.
दरम्यान मालेगाव स्टँड, ढिकले वाचनालाय, खांदवे सभागृह, दुतोंडया मारुती व यशवंत महाराज पटांगणाकडून रामकुंडाकडे जाणारे सर्व रस्ते चारचाकी वाहनांसाठी बंद ठेवण्यात आले होते. मंगेशकर कुटुंबिय आज गुरूवारी नाशिकमध्ये उपस्थित असल्याने शासकीय विश्रामगृह आरक्षित करण्यात आले आहे. तसेच, मंगेशकर कुटुंबियांच्या सांगण्यानुसार धार्मिक विधी पार पडणार आहेत.