मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री मानेच्या दुखण्यामुळे HN रिलायन्स रुग्णालयात दाखल झाले होते. आज सकाळी साडेसात वाजता उद्धव ठाकरे यांच्यावरील शस्त्रक्रिया सुरू झाली होती. वरिष्ठ आँर्थो सर्जन डॉक्टरांच्या पथकाने तासभर ही शस्त्रक्रिया केली. सकाळी पाऊने नऊ वाजता ऑपरेशन यशस्वी झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
मुख्यमंत्री ठाकरे यांना बुधवारी एच एन रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तपासण्यांनंतर शस्त्रक्रियेचा निर्णय घेण्यात आला. उद्धव ठाकरे यांच्यावर आधी घरगुती उपचार सुरू होते. त्यांच्या तब्येतीत सुधारणाही झाली. मात्र पुन्हा एकदा मान व पाठदुखीचा त्रास होऊ नये यासाठी डॉक्टरांनी शस्त्रक्रियेचा पर्यायी सल्ला दिला होता. त्यानंतर आता शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे.
मुख्यमंत्रिपदाची धुरा शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपवण्यात येणार असल्याचं वृत्त सोशल मीडियावर व्हायरल होत होतं. परंतु हे वृत्त निराधार असून एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयाकडून या वृत्ताचं खंडन करण्यात आलं आहे. ‘मुख्यमंत्रिपदाचा तात्पुरता कार्यभार नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपविण्यात आल्याचे वृत्त सोशल मीडियावरून व्हायरल होत असून त्यात कुठलेही तथ्य नाही. मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांच्यावर एक छोटीशी शस्त्रक्रिया करण्यात येणार असून, त्यानंतर अवघे तीन ते चार दिवस आराम केल्यानंतर ते पुन्हा जनतेच्या सेवेत रुजू होतील. त्यामुळे समाजमाध्यमावर फिरणाऱ्या खोट्या आणि खोडसाळ मेसेजस, पोस्टवर विश्वास ठेवू नये,’ असं आवाहन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयाकडून करण्यात आलं आहे.