न्यूयॉर्क : 5 ऑक्टोबरची सायंकाळ टेलिग्राम अॅपसाठी ऐतिहासिक ठरली. या दिवशी अॅपशी तब्बल 7 कोटी यूजर्स जोडले गेले. टेलिग्रामच्या या मोठ्या यशामागे फेसबुक आऊटेज चे कारण होते. त्या दिवशी सायंकाळी फेसबुकसह व्हॉटस् अॅप आणि इन्स्टाग्राम ठप्प झाले होते. सहा तासांपेक्षाही अधिक काळ हे प्लॅटफॉर्म बंद राहिल्याने टेलिग्रामला त्याचा लाभ मिळाला. टेलिग्रामची मंथली अॅक्टिव्ह यूजर्सची संख्या 50 कोटींपेक्षा अधिक झाली आहे.
टेलिग्रामचे सीईओ पॉवेल डुरोव यांनी सांगितले की फेसबुक आऊटेज दरम्यान टेलिग्रामशी मोठ्या संख्येने नवे यूजर्स जोडले गेले. टेलिग्रामची डेली ग्रोथ रेट अधिक झाली आहे. आम्ही एकाच दिवसात 7 कोटींपेक्षा अधिक यूजर्सचे स्वागत केले. आमच्या टीमने ही स्थिती चांगल्या प्रकारे हाताळली याचा आम्हाला अभिमान आहे. व्हॉटस् अॅप आऊटेजला ट्रॅक करणारी वेबसाईट ‘डाऊनडेक्टर’ने म्हटले आहे की 40 टक्के यूजर्स अॅप डाऊनलोड करण्यास असमर्थ होते.
30 टक्के यूजर्सना मेसेज पाठवण्यात समस्या होती. 22 टक्के यूजर्सना वेब एडिशनमध्ये समस्या होती. टेलिग्राममध्ये अनेक आकर्षक फिचर्सही असल्याने यूजर्सनी तिकडे मोर्चा वळवला. टेलिग्राममध्ये 2017 पासून पेमेंट बॉटही आहे. सुरक्षित पद्धतीने पेमेंट करण्याची संधी यामुळे यूजर्सना मिळते.
तसेच टेलिग्रामवर व्हॉईस चॅटला शेड्यूल करता येते. ग्रुप अॅडमिन आणि चॅनेल्स व्हॉईस चॅटला डेट आणि टाईम टाकून शेड्यूल करू शकतात. चॅटिंगच्या दरम्यानच प्रोफाईल फोटोही बदलता येतो. अॅनिमेटेड स्टिकर्स, डार्क मोड, चॅट फोल्डरसारख्या अन्य सुविधाही यामध्ये आहेत.