चंद्रपूर/मुंबई : चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यांतील ११ हरहुन्नरी तरुणांनी चक्क हायड्रोजनवर चालणारी कार स्वखर्चाने तयार केली असून मुंबईत ही कार पाहून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील चकित झाले. सोनीक वन असे या कारचे नाव ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर या कारमध्ये करण्यात आला आहे. प्रदूषण विरहित, ऑटो ड्राईव्ह, हायड्रोजन बेस्ड, आर्टिफिशीयल इंटेलिजन्स नियंत्रित अशी ही कार दोन वर्षांत तयार करण्यात आली.
या कारमध्ये सुरक्षा साधनांपासून सर्व लक्झरी सुविधा उपलब्ध आहेत. टायर आणि काचा वगळता कारसाठी वापरण्यात आलेली सर्व उपकरणे युवकांनी तयार केली आहेत. एक किलो हायड्रोजनवर कार २५० किमी अंतर पार करते, असा दावा या युवकांनी केला आहे.
आमदार किशोर जोरगेवार यांनी मुंबईत फडणवीस यांच्याशी या युवकांची भेट घडवून आणली. फडणवीस यांनी कारची पाहणी करून संपूर्ण माहिती जाणून घेतली. प्रदूषण अत्यंत कमी करणारे तंत्रज्ञान या कारमध्ये वापरण्यात आले आहे. ही कार महाराष्ट्राच्या रस्त्यावर आणण्यासाठी सरकारच्यावतीने या विदर्भवीरांना सर्व सहकार्य केले जाईल, असा विश्वास फडणवीस यांनी या तरुणांना दिला.