कळमनुरी: हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील येलकी येथे ओढ्याला पुर आल्याने त्यातून तीन वर्षात तब्बल ५०० जणांची पुराच्या पाण्यातून सुखरूप वाहतूक करणाऱ्या येलकी येथील तरुणाचा पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने मृत्यू झाला. बुधवारी (दि.८) रोजी पहाटे ऊसाच्या फडात अडकलेल्या स्थितीत त्याचा मृतदेह सापडला. लखन प्रकाश गजभारे (वय २३) असे त्याचे नाव आहे.
कळमनुरी तालुक्यातील येलकी गावाजळून एक ओढा वाहतो. या ओढ्याचे पाणी कयाधू नदीला जाऊन मिळते. त्यामुळे कामठा फाटा येथून येलकी, बेलथर, गोटेवाडी या गावामधील गावकऱ्यांना गावी येण्यासाठी पावसाळ्यात हा ओढा पार करावा लागतो.
या ओढ्यावर पुल असला तरी त्याची उंची कमी आहे. त्यामुळे पावसाळ्यात ओढ्याच्या पाण्यातून गावाकडे जावे लागते.
दरम्यान, या गावातील गावकऱ्यांना दररोज आखाडा बाळापूर येथे कामासाठी जावे लागले. त्यामुळे पावसाळ्यात या गावकऱ्यांची गावाकडे परत येण्यासाठी मोठी अडचण होते.
सदर बाब लक्षात घेऊन लखन गजभारे यांच्यासह इतर मित्रांनी युवक मंडळ तयार केले. पुराच्या पाण्यात पोहणाऱ्या तरुणांचा या मंडळामध्ये समावेश केला.
यानंतर पावसाळ्यात कामठा फाटाकडून येलकी गावाकडे येणाऱ्या गावकऱ्यांना ओढ्याच्या पुरातून सुखरुप आणण्याचे काम युवक करीत होते.
यामध्ये लखनचाही सहभाग होता. याशिवाय येलकी, बेलथर, गोटेवाडी व परिसरातील गावातील आजारी व्यक्तीला तसेच वयस्कर व्यक्तींना पुरातून कामठ्या फाट्याच्या रस्त्याकडे आणून सोडले जात असे.
दरम्यान, मागील तीन वर्षात लखनने किमान ५०० जणांना या पुरातून ओढ्याच्या एका काठावरून दुसऱ्या काठावर सुखरुप नेऊन सोडले आहे. मंगळवारी (ता. ७) सायंकाळी पुरातून येत असताना अचानक तो पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेला.
त्यानंतर आखाडा बाळापूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पंढरीनाथ बोधनापोड यांच्यासह गावकरी भारत देसाई व इतर गावकऱ्यांनी त्याच्या शोध सुरु केला होता.
आज पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास लखन गजभारे याचा मृतदेह ओढ्यापासून काही अंतरावर ऊसाच्या फडामध्ये अडकलेला आढळून आला.
मागील तीन वर्षात ५०० जणांना पुराच्या पाण्यातून वाहतूक करीत सुखरुप बाहेर काढणाऱ्या लखनचा मृत्यू गावकऱ्यांना चटका लावणारा ठरला आहे.
मयत लखन याच्या पश्च्यात आई, वडील, तीन भाऊ असा परिवार आहे.
ओढ्याच्या पुलाची उंची वाढवावी
येलकी गावाजवळ असलेल्या ओढ्यावरील पुल जमिनीपासून काहीच अंतरावर आहे.
त्यामुळे पावसाळ्यात कमी पावसात त्याला पुर येवून येलकी, गोटेवाडी, बेलथर या गावांचा संपर्क तुटतो.
त्यामुळे प्रशासनाने या पुलाची उंची वाढविणे गरजेचे आहे.
त्यासाठी लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज असल्याचे भारत देसाई याच्यासह अनेक गावकऱ्यांनी म्हटले आहे.