अकोला- जिल्हाधिकारी श्रीमती निमा अरोरा यांनी आज अकोट व तेल्हारा तालुक्यात भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेमार्फत करण्यात आलेल्या विविध जलोपचार व जलपूनर्भरण उपक्रमांची पाहणी केली.यावेळी त्यांचे समवेत उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार , उपविभागीय अधिकारी देशपांडे,वरिष्ठ भूवैज्ञानिक पी पी बर्डे, तसेच जि. प.सदस्य संजय आढाऊ तसेच पाटसुळ, लाडेगाव,मक्रंपुर येथील ग्रामपंचायत सदस्य सरपंच ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी त्यांनी केलेल्या पाहणीत पाटसुल या खारपाण पट्ट्यात मधील गावाला पाणी टंचाई २०२०-२१अंतर्गत खोदण्यात आलेल्या हातपंपास लागलेले गोड पाणी याबाबत पाहणी केली. या पाण्याचे टीडीएस मीटर द्वारे तपासणी यावेळी करण्यात आली.पाणी टंचाई उपाययोजनेअंतर्गत लाडेगाव व मक्रंपुर या गावांमध्ये खोदण्यात आलेल्या कूपनलिकाची पाहणी करण्यात आली. मक्रंपुर येथे असेच ३०० फुटाचे बोर केल्यामुळे गावाची पाणी टंचाई दूर झाली असे गावकऱ्यांनी सांगितले तसेच त्या बोअर मधून पाणी कसे उपलब्ध होते याबाबत प्रात्यक्षिक सुद्धा दाखवण्यात आले.
तेल्हारा तालुक्यातील तलई चुनखडी अंबाबारवा या पुनर्वसित गावांना भेट देऊन गावकऱ्यांच्या रस्त्याच्या पिण्याच्या पाण्याच्या समस्या जाणून घेतल्या व त्या संदर्भात कारवाई करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले. त्यानंतर त्यांनी वाण धरणाला भेट दिली. वान धरण भरल्यानंतर त्यामधील विसर्ग चे पाणी नदी वाटे सोडण्यात येते. परंतु नवीन संकल्पनेनुसार पुराचे पाणी नदी वाटे न सोडता कालव्यामध्ये सोडून विहीर तसेच बोर पुनर्भरणाची प्रत्यक्षात कशा प्रकारे होऊ शकते याबाबत सौंदळा व सोनवडी या गावातील वांन धरणाच्या मुख्य कालवा परिसरामध्ये असलेल्या विहिरींची पाहणी केली.