तुम्ही अनेकदा बघितले असेल की प्रतिशोधामुळे अनेक धक्कादायक घटना घडत असतात. आता बदल्याच्या भावनेतून अशीच एक विचित्र घटना बिहारच्या समस्तीपुर जिल्ह्याच्या दलसिंहसराय या गावात घडली आहे.
नोकरी गेल्याच्या रागातून एका कंपाऊंडरने थेट महिला डॉक्टरशीच बदला घेतला आहे. नोकरी गेल्यामुळे त्याने थेट महिला डॉक्टरशीच लग्न केले आहे. संबंधित घटनेचा व्हिडिओ आणि फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
जबरदस्ती करुन लग्न केल्यामुळे महिला डॉक्टरने कंपाऊंडरविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पीडित महिला डॉक्टर या दलसिंहसराय प्राथमिक स्वास्थ केंद्रच्या प्रभारी पदाधिकारीही आहे. तसेच त्याच परीसरात त्या डॉक्टरचा एक दवाखानाही आहे.
या महिला डॉक्टरसोबत सुमित कुमार नावाचा तरुण कंपाऊंडर म्हणून काम करत होता. पण सुमितचे वागणे बदलत होते. तो डॉक्टरसोबत विचित्र वागत होता. त्यामुळे काही दिवसांपुर्वीच त्याच्या विचित्र वागण्यामुळे डॉक्टरने त्याला कामावरुन काढून टाकले होते.
नोकरीवरुन काढल्याचा राग सुमितच्या मनात तसाच होता. त्यामुळे त्याला बदला घ्यायचा होता. एक दिवशी तो अचानक डॉक्टरांच्या कॅबिनमध्ये गेला आणि दरवाजा बंद करुन घेतला आणि जबरदस्ती त्या महिला डॉक्टरांच्या भांगेमध्ये कुंक शेंदूर लावले. तसेच संबंधित घटनेचा व्हिडिओही सुमितने काढला आहे. तसेच त्याने याचे फोटोही सोशल मीडियावर पोस्ट केले आहे.
आता त्या महिला डॉक्टरने याप्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर पोलिसांनी चौकशी केली असता, तो आरोपी गावातून फरार झाल्याचे समोर आले आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहे. पण सध्या महिला डॉक्टरचे आणि त्या कंपाऊंडरचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे.