आता पावसाळा सुरु आहे. पावसाचे पाणी हे आता अक्षरशः डोळ्यासमोरुन वाहून जाते. त्याऐवजी हे वाहून जाणारे पाणि विहीरी व कुपनलिकांद्वारे पुन्हा भूगर्भात साठवल्यास ते आपल्याला गरजेच्या वेळी पुन्हा वापरता येते. पावसाचे पाणी विहिरीत सोडणे म्हणजे विहीर पुनर्भरण होय. शेतातील ओहोळ, ओढा किंवा नाल्यातून वाहून जाणारे पाणी किंवा पाण्याचा अपधाव यांचा वापर करता येतो. किंवा शहरी वा ग्रामिण भागातही आपल्या घराच्या छतावर पडणारे पावसाचे पाणीही आपण विहीर वा कुपनलिकेत साठवून ठेवू शकतो.
आत्ता पावसाळ्यात विहीर भरल्याने पाणी जमिनीत अधिक मुरते. खोलवर जाते. ज्या जलस्तरातील पाणी उपसले गेले होतेम त्या जलस्तरात पुन्हा पाणी साठते, पाणी मुरते. पावसाळ्याच्या संपूर्ण हंगामात अशाप्रकारे पाण्याने भरलेल्या विहीरीच्या सर्वात खोलवर असलेल्या थरापर्यंत भूजलाचे पुनर्भरण होते.
जागा कशी निवडावी?
शेतात विहीर पुनर्भरण करतांना शेतातील ओहोळ , नाला , ओढ्या पासून किमान १२ ते १८ मिटर लांब असावी. भूजल पातळीत घट होणाऱ्या विहिरीची निवड करावी. ज्या विहिरीत भेगा असणारा खडक असतो त्या विहिरीची पाणी ग्रहण क्षमता अधिक असते. त्यामुळे अशी विहीर पुनर्भरणासाठी योग्य. विहिरीजवळ नाला, ओढा यासारखा स्त्रोत नसल्यास विहिरीपेक्षा उंच भागातील अपधावेने जमा होणारे पावसाचे पाणीही विहिरीत पुनर्भरण करता येते.
विहीर पुनर्भरण पद्धती
उपलब्ध होणारे पाणी हे शेतात साठवण आणि गाळण अशा दोन खड्ड्यात घ्यावे. साठवण खड्ड्यात मध्यभागी एक आडवे छिद्र घेऊन हा खड्डा पी.व्ही.सी. सहा इंची पाईपद्वारे गाळण खड्ड्यास जोडावा. साठवण खड्ड्याकडील पाईपच्या तोंडाला मोठ्या छिद्रांची जाळी बसवावी. साठवण खड्ड्यात जमा होणारे पाणी स्थिरावून पाण्यामधील पालापाचोळा, कचरा इ. वगळून पाणी गाळण खड्ड्यात जाईल. भौगोलिक स्थिती नुसार साठवण व गाळण खड्ड्याच्या आकारमानात बदल करावा.
विंधन विहीर/ कुपनलिकांद्वारे भूजल पुनर्भरण
भुपृष्ठावरील पाणी विंधन विहीर/ कूपनलिकेत भरुन हे पुनर्भरण केले जाते. त्यासाठी वरील प्रमाणे ओढा, नाला येथील पाणी हे साठवण खड्ड्यात वळवावे. आणि तेथून पाणी गाळण खड्ड्यात सोडावे. पुनर्भरणासाठी विंधन विहीर,कूपनलिकेच्या सभोवताली दोन मिटर लांब, दोन मीटर रुंद आणि दोन मीटर खोल खड्डा खोदावा. या खड्ड्याच्या तळापासून ०.४५ मीटर वर पर्यंत केसिंग पाईपला एक दोन से.मी. अंतरावर सर्व बाजूने चार पाच मि.मी व्यासाची छिद्रे पाडावीत. या छिद्रांवर नारळ दोरी(काथ्या),/ नायलॉन जाळी घट्ट गुंडाळावी. अशा प्रकारे नाल्या/ ओढ्यातील पावसामुळे वाहून येणारे गढूळ पाणी साठवण खड्ड्यातून गाळण खड्ड्यात स्वच्छ होऊन विंधन विहीर/ कुपनलिकेत जाईल आणि पुनर्भरण होईल. या खड्ड्याच्या आकारातही गाळण व साठवण खड्ड्याच्या आकारमानात बदल करता येईल.
पुनर्भरण करतांना घ्यावयाची काळजी
गाळण खड्ड्यात चांगल्या प्रतीचे जाड वाळू, विटांचे तुकडे, कोळशाचे तुकडे, गोटे हे गाळणासाठी वापरावे. स्वच्छ पाणी पुनर्भरणासाठी विहीरीत जाईल याची खबरदारी घ्यावी. पाण्यासोबत गाळ गेल्यास भूप्रस्तराची सच्छिद्रता कमी होऊन कालांतराने विंधन विहिरीची शाश्वतता कमी होत जाते. विहीरीत येणारा पाईप हा विहिरीच्या आत किमान एक मिटर असावा. गाळण खड्ड्यातून विहीरींकडे येणाऱ्या पाईपसाठी खोदलेला चर मातीने पूर्णतः भरून घ्यावा. तसेच दरवर्षी पुनर्भरणापूर्वी विहीरीतील गाळ काढून टाकावा. तसेच गाळण खड्डा पावसाळ्यापूर्वी स्वच्छ करावा.
छतावरील पाण्याद्वारे भुजल पुनर्भरण
पावसाचे जे पाणी छतावर पडते त्या पाण्याचे संकलन करुन ते विहिरीत अथवा कूपनलिकेत सोडावे.छतावरील पाणी फिल्टर करुन इमारतीजवळ असलेल्या टाकीत साठवून विहिरीत वा विंधन विहिरीत किंवा शोषखड्डयाद्वारे जमिनीत मुरविणे. यासाठी जमिनीवर एक गाळण खड्डा करता येतो. आणि जमिनीत गाळण खड्डा करता येतो.
बाजारात तयार मिळणारे रेनी फिल्टर ही बसविता येते. त्यात उभी उताराची स्टील जाळी असते. त्यातून त्वरीत कचरा व पाणी वेगळे होतात. कचरा खाली वेगळ्या पाईपद्वारे जमिनीवर जमा होतो व स्वच्छ पाणी दुसऱ्या पाईपद्वारे पुनर्भरण करण्यासाठी वापरता येते. गाळण खड्ड्यातून स्वच्छ झालेल्या पाण्याने विहीर, विंधन विहीर, शोषखड्डा भुजल पूनर्भरण करता येते. गाळण खड्ड्यात चांगल्या प्रतीचे जाड वाळू, विटांचे/ कोळशाचे तुकडे, गोटे इ. गाळणासाठी वापरावे. दरवर्षी गाळण खड्डा स्वच्छ करावा.
-माहिती संदर्भः भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा.
-संकलनः जिल्हा माहिती कार्यालय, अकोला.