अकोला– मुख्यमंत्री महाआरोग्य अभियानाअंतर्गत जिल्हा प्रशासन तसेच जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अकोला यांच्यावतीने आरोग्य क्षेत्रातील विविध कौशल्य विकास प्रशिक्षण देण्याचा उपक्रम गुरुवार दि.८ पासून सुरुवात होत आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे या प्रशिक्षण कार्यक्रमाचे ऑनलाईन पद्धतीने दुपारी तीन वाजता उद्घाटन करतील. येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमास अकोला येथून जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण,अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
यासंदर्भात जिल्हा कौशल्य विकास कार्यकारी समितीच्या बैठकीत (दि.१ जून रोजी) मुख्यमंत्री महा-आरोग्य अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले होते. कौशल्य विकास प्रशिक्षणास इच्छुक उमेदवारांच्या सुविधेसाठी अकोला जिल्ह्याच्या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणीसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. उमेदवारांनी नोंदविलेल्या पसंती क्रमाच्या आधारे त्यांना आरोग्य क्षेत्रातील विविध प्रशिक्षणात सहभागी करून घेण्यात येत आहे. उमेदवारांना देण्यात येणारे कौशल्य विकास प्रशिक्षण पूर्णपणे नि:शुल्क असुन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा स्त्री रुग्णालय, अकोला येथे हे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अकोला हे या प्रशिक्षण कार्यक्रमाचे समन्वयन करणार असुन जे उमेदवार आरोग्य क्षेत्रात कौशल्य विकास प्रशिक्षण घेण्यास इच्छुक असतील त्यांनी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, दुसरा माळा, अकोला येथे प्रत्यक्ष किंवा ०७२४-२४३३८४९ या क्रमांकावर दुरध्वनीव्दारे संपर्क करावा,असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अकोला द. ल. ठाकरे यांनी केले आहे.