आळेफाटा : फोटो व्हायरल करण्याची धमकी देत १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर पाच मित्रांनी दोन वर्ष सामुहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना आळेफाटा (ता. जुन्नर) परिसरात घडली आहे. याबाबत पीडितीने गुरुवारी (१ जुलै) रात्री उशिरा आळेफाटा पोलिसात फिर्याद दिली. या प्रकरणी चार जणांना अटक केली असून एक आरोपी फरार आहे. या घटनेमुळं परिसरात खळबळ उडाली असून लोकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका (१४ वर्षीय) अल्पवयीन मुलीसोबत ओळख करून घेत तिचे फोटो काढत इतरांना पाठवण्याची धमकी देऊन पाच मित्रांनी दोन वर्ष सामुहिक बलात्कार केल्याची माहिती आळेफाटा पोलिसांनी दिली आहे. तरुणीच्या वडिलांना जीवे मारण्याची धमकी देत पाच मित्रांनी नगर रोडवरील एक लॉजवर १५ जून २०१९ ते १५ जून २०२१ च्या दरम्यान वेगवेगळ्या गाड्यांमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याचं समोर आलं आहे.
या प्रकरणी पीडितीचे तक्रारीवरून निखिल पोटे, विकी पोटे, बंटी तितर, दया टेमगिरे, यश गाडेकर (सर्वांचे वय २८ वर्षापेक्षा अधिक, रा. आळेफाटाता, जुन्नर, जि. पुणे) यांच्या विरुद्ध बलात्कारासह बाललैंगिक अत्याचार विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी चार आरोपीसह एक आलिशान वाहन ताब्यात घेतले आहे. एका आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत. आळेफाटा पोलीस निरीक्षक मधुकर पवार पुढील तपास करत आहे.