अकोला – मतदार यादीत छायाचित्र नसलेल्या मतदारांकडून छायाचित्र प्राप्त करण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी घरोघरी भेटी दिल्यानंतर काही मतदार हे दिलेल्या पत्त्यावर कायमस्वरुपी राहत नसल्याचे दिसून आले आहे. अशावेळी नावे वगळण्याची कारवाई करणे आवश्यक असते, जिल्ह्यातील अशा छायाचित्र नसलेल्या व दिलेल्या पत्त्यावर आढळत नसलेल्या मतदारांची नावे वगळण्याची प्रक्रिया लवकरच सुरु होणार आहे. त्यासाठी येत्या दि.५ जुलै पर्यंत कुणाची हरकत आक्षेप असल्यास ते नोंदवावे,असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.
भारत निवडणूक आयोगाकडून मतदार यादीत छायाचित्र नसलेल्या मतदाराकडून छायाचित्र् प्राप्त करून ते मतदार यादीत अंतर्भूत करणे बाबत निर्देश प्राप्त झाले आहे. त्याअनुषंगाने संबंधीत मतदारांच्या घरोघरी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बी एल ओ) यांनी डिसेंबर २०१९ ते मार्च २०२१ या कालावधीत भेटी दिल्या, त्यावेळी मतदार याद्यांमध्ये छायाचित्र नसलेल्यांपैकी काही मतदार त्यांच्या मतदार यादीत नमूद असलेल्या निवासी पत्त्यावर कायमस्वरुपी राहत नसल्याचे निदर्शनास आले आहे. मतदार यादीत छायाचित्र नसलेल्यांपैकी जे मतदार त्यांच्या मतदार यादीत नमूद असलेल्या निवासी पत्त्यावर राहत नसल्याचे आढळून येत असल्यास, लोकप्रतिनिधी अधिनियम, १९५० व मतदार नोंदणी अधिनियमाच्या, १९६० मधील तदतूद व भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सुचनांनूसार संबंधित मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्याची कार्यवाही करण्यात येते.
त्याअनुषंगाने मतदार यादीत फोटो नसलेल्या मतदारांची यादी ही मतदार नोंदणी अधिकारी, यांचे कार्यालय, तहसिल कार्यालय, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयात सर्व नागरीकांना पाहण्यास उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच ही यादी अकोला जिल्ह्याच्या संकेतस्थळावरही प्रसिद्ध करण्यात आली आहे. ती पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे.
https://akola.gov.in/notice_category/announcements
ज्या मतदारांचे छायाचित्र मतदार यादीमध्ये नाही त्यांनी त्यांचे फोटो व यादीतील नावे वगळण्याबाबत आक्षेप असणाऱ्या व्यक्तिंनी त्यांचा लेखी आक्षेप विहीत मुदतीच्या आत संबंधित मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयात नोंदवावे. हरकती किंवा आक्षेप वेळेत प्राप्त न झाल्यास अशा मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्याची कार्यवाही ही मतदार नोंदणी अधिकारी यांच्या स्तरावरून करण्यात येईल.
तरी अकोला जिल्ह्यातील सर्व संबंधित मतदारांनी याबाबत आपले विहित नमुन्यातील अर्ज भरुन मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांचेमार्फत मतदार नोंदणी अधिकारी व सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांचेकडे द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.